पुणे : प्रतिनिधी
डी.एस. कुलकर्णी यांच्यावर उपचार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ४८ तासापर्यंत त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी दिले आहेत. तसेच डीएसकेंनी उपचार कोठे घ्यायचे हा विषय विनाकारण प्रतिष्ठेचा करू नका, असेही न्यायालयाने सुनावले.
कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत हा रुग्णाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ससून मेडिकल बोर्डच्या अहवालासह २३ फेब्रुवारीला दुपारी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर डीएसकेंना पोलिस कोठडी द्यायची का नाही यावर निर्णय होणार आहे.
ठेवीदारांना पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णींना दि.17 रोजी पत्नीसह दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे ही कारवाई केली. पैसे परत करण्याच्यासाठी दिलेली वेळ न पाळल्याने उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेण्यात आले होते.