Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Pune › ‘स्वच्छ भारत’साठी सायकल रॅली

‘स्वच्छ भारत’साठी सायकल रॅली

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 11:17PM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

आत्मविश्‍वास आणि जिद्द असेल तर जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही. बांबू स्पाईन या व्याधीने ग्रस्त असलेले माजी कुस्तीपटू पोपटराव खोपडे हे मात्र अशीच जिद्द उराशी बाळगून रायरेश्‍वर किल्ला ते नवी दिल्ली असा सायकल प्रवास करणार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि स्वछतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने खोपडे यांनी ही यात्रा सुरू केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. 

माजी कुस्तीवीर आणि सायकलपटू पोपटराव खोपडे यांना वयाच्या 35व्या वर्षी पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा परिणाम बांबू स्पाईन या व्याधीमध्ये झाला. या व्याधीमुळे खोपडेंच्या शरीराच्या काही भागाची हालचाल बंद झाली. केवळ जिद्दीच्या जोरावर खोपडे हे सध्या रायरेश्‍वर किल्ला ते नवी दिल्ली 2000 किमीच्या सायकल यात्रेवर असून 3 डिसेंबरला त्यांनी रायरेश्‍वर किल्ल्यापासून यात्रेला सुरवात केली आहे.

या दिव्यांग संदेश यात्रेदरम्यान खोपडे 4 राज्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा यांना भेट देणार असून या यात्रेदरम्यान ते विविध शाळा आणि कॉलेजेस मधील तरुणांशी संवाद साधून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करणार आहेत. 45 दिवसीय यात्रेच्या वेळापत्रकानुसार खोपडे नवी दिल्लीला 21 जानेवारी 2018 ला पोचतील. खोपडे यांच्या या जिद्दीला आणि उपक्रमाला जायंट स्टारकेन यांनी पुढाकार घेतला असून 2 लाख रुपये किमतीच्या 2 प्रीमियम सायकल्स भेट दिल्या आहेत. त्याचबरोबर लागणारी सर्व उपकरणे आणि सायकल्सचे पार्ट्स देखील खोपडे यांना स्टारकेनने दिले आहेत. 

याबाबत बोलताना खोपडे म्हणाले की, नवल फाउंडेशन महात्मा गांधींच्या आदर्शावर चालते आणि बदल घडवायचा असेल तर तुम्हाला बदलावे लागेल ही त्यांची  शिकवण आम्ही मानतो. विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्याची ताकत खेळामध्ये आहे. या यात्रेमागे माझे 2 उद्देश आहेत- पहिला म्हणजे दिव्यांग लोक सायकलिंगसारख्या क्रीडा प्रकारात आणि इतर अनेक धाडसी खेळात सहभागी होत नाहीत हा भ्रम दूर करणे आणि दुसरा म्हणजे देशातील तरुणांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी जागरूकता निर्माण करणे. या यात्रेदरम्यान मी केवळ प्रवास करणार नसून विविध राज्यातील किल्ल्यांची स्वच्छतादेखील करणार आहे.