Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Pune › सायबर भामट्यांचे रोज नवे फंडे 

सायबर भामट्यांचे रोज नवे फंडे 

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 1:18AM- पुष्कराज दांडेकर 

घटना 1 - फोन खणाणतो, समोरील अनोळखी व्यक्ती मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाईल सीमचा मागील क्रमांक विचारतो, तुम्ही सीमचा मागील अकरा अंकी क्रमांक सांगता अन् क्षणार्धात तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गायब होते. त्यानंतर लगेचच त्या मोबाईल क्रमांंकाशी जोडले गेलेल्या बँक खात्यातील पैसे गायब होतात. जर बँक खात्याला मोबाईल क्रमांक जोडला नसेल तर मग सुरू होतो तुमच्या सीमचा गैरवापर. याला सीम स्वाईप म्हणतात. 

घटना 2 - घरातील लॅण्डलाईन खणाणतो, घरातील मुलगा फोन उचलते आणि समोरील अनोळखी व्यक्ती सांगते तुमच्या वडीलांच्या पेन्शनची, इन्शुरन्सची लाखोंची रक्कम जमा आहे. ती हवी असेल तर खात्यात पैसे भरा. पैसे भरले जातात मात्र पेन्शनची रक्कम काही मिळत नाही. 

या दोन्ही घटना म्हणजे एटीएम स्वाईप आणि कार्ड क्‍लोनिंगनंतरचे सायबर भामट्यांचे तुम्हाला फसविण्याचे नवीनच फंडे आहेत. सायबर भामट्यांनी या नवीन फंड्यांच्या माध्यमातून देशभरातील हजारो लोकांना गंडा घातला आहे. तर पुण्यात या प्रकारे फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे येऊ लागल्या आहेत. या सीम स्वाईपच्या आतापर्यंत 6 तक्रारी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील डोकेदुखी वाढलेली आहे. 

तर दुसर्‍या प्रकारात सायबर भामट्यांनी मोबाईलसह आता लॅन्डलाईन दुरध्वनीवर संपर्क साधून फसविण्याचा नवीन फंडा सुरु केला आहे. लॅन्डलाईन फोनचा डाटा सार्वजनिक आहे. तसेच या फोन क्रमांकांची माहिती क्षणार्धात डिरेक्टरीतून मिळते. त्यामुळे हे सायबर भामटे या क्रमांकांवर फोन करून अशा प्रकारे फसविताना दिसताहेत.  पुणे पोलिसांच्या सायबर  गुन्हे शाखेकडे मागील पाच महिन्यात अशा प्रकारच्या 34 तक्रारी आल्या आहेत. 

कंपन्यांच्या सुविधा अद्ययावत करण्याचा गैरफायदा 

सध्या मोबाईल कंपन्यांकडून सर्विस अपग्रेड (सुविधा अद्ययावत करणे) तसेच कंपन्यांचे एकत्रिकरण करण्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. या प्रक्रिया सुरु असताना नागरिकांना थ्री जीमधून फोर जीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी किंवा सीम बदलून घ्यावे लागते. त्यामुळे या भामट्यांकडून कंपनीच्या नावाने फोन केला जातो. त्यामुळे नागरिकांनाही विश्‍वास बसतो आणि ते सांगतील त्या कृती केल्याने त्यांची फसवणूक होते. त्यामुळे सीम कार्डचा मागील क्रमांक कोणीही फोन केल्यास सांगू नये. असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे. 

दुहेरी फसवणूक 

सीम स्वाईप प्रक्रियेत तुमचे सीम बंद करून भामटे त्यांच्या मोबाईलवर ते सीम सुरु करून घेतात. त्यानंतर काही काळातच या मोबाईल क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते, सोशल मीडिया, आणि इतर माहिती ते घेतात. त्याद्वारे बँक खात्यातील पैसे तर जातातच; मात्र तुमच्या फेसबुक,व्हॉटस अप आणि इन्स्टाग्राम यांच्या माध्यमातून समाजात बदनामी करण्याचेही काम त्यांच्याकडून केले जाते. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.