Wed, Mar 27, 2019 04:20होमपेज › Pune › सायबर बँक भामट्यांचा ग्रामीण भागावर डोळा

सायबर बँक भामट्यांचा ग्रामीण भागावर डोळा

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:10PMआळंदी : श्रीकांत बोरावके 

बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन लाखोंचा गंडा घातला जात असल्याच्या प्रकारात ग्रामीण भागात वाढ होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील खातेदारांना लक्ष केले जात आहे, अशी मोठी टोळी सक्रिय आहे. अशा फसवणुकीच्या घटना मध्यमवर्गीयांमध्ये जास्त घडत असून, बँकिंग साक्षरतेचा अभाव असल्यामुळे काही ग्राहक याला बळी पडताना दिसतात. 

सूज्ञ ग्राहक सायबर भामट्यांच्या अशा कॉल्सला उत्तरे देत नाहीत, परंतु अशा कॉल्स आलेल्या भामट्यांकडून फसवले गेलो नाही यात समाधान मानतात. परंतु असा संपर्क आपल्याला साधला गेला होता, अशी तक्रार किंवा माहिती पोलिसांना देत नाही. यामुळे तो भामटा निर्धोकपणे हा नाही तर तो बकरा शोधतच असतो आणि त्यांच्या हाती एखादा लागतोच.अशा भामट्यांकडून एटीएमची माहिती घेऊन ऑनलाइन महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात व त्याच वस्तू कमी किंमतीत विकल्या जातात. जादा तर असा गुन्हा करणारे गुन्हेगारही तरुण असून आपल्या शिक्षणाचा उपयोग गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.  गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारे सीम ही चोरी केलेली कागदपत्रे देऊन खरेदी करण्यात येत असल्याने पोलिस यंत्रणेलाही खरे गुन्हेगार पकडणे अवघड जाते. या गुन्ह्यांवर निर्बंध आणणे अवघड असून सतर्कता हाच यापासूनचा उपाय आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक लक्ष होत असून, शहरातील अशा गुन्ह्यांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. सद्या सर्वंच शासकीय आणि खासगी वेतनप्रक्रिया ऑनलाईन होत असताना सरकारी अनुदाने बँक खात्यावर जमा होत असताना, अशा प्रकारच्या गुन्हांमध्ये होत असलेली वाढ ऑनलाइन प्रक्रियेवरच असुरक्षितता दर्शवते. याबाबत काही बदल अपेक्षित असून एटीएमचा वापर करताना मोबाइलवर येणारा वन टाईम पासवर्ड सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर असून, त्याचा वापर वाढल्यास या गुन्ह्यावर काही प्रमाणात निर्बंध येतील.

सायबर क्राईममध्ये वाढ 

ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमांतून नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सायबर सेलकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही नागरिक या आमिषांना बळी पडत आहेत. यामध्ये अनेकांची काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत फसवणूक होत आहेत. ऑनलाइन पध्दतीने फसवणूक करणारे परदेशातून तसेच परराज्यांतून सूत्रे हाताळत असल्याने त्यांना जेरबंद करण्याचेही मोठी आव्हान पोलिसांपुढे असते.

अशी होते फसवणूक...

ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणारे भेटवस्तू किंवा स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात अडकवतात. या आमिषाला भुलून नागरिक ऑनलाइन पद्धतीने संबंधितांच्या बँक खात्यात पैसे भरतात. मात्र, हे बँक खाते इतर राज्यात किंवा दुसर्‍या देशात असते. बँकेत पैसे जमा झाल्यानंतर आरोपी सर्व पैसे काढून घेऊन खाते तसेच मोबाइल बंद करतात. खाते उघडताना तसेच सिमकार्ड घेताना खोटी कागदपत्रे सादर केलेली असतात. या मुळे पोलिसांना आरोपींचा माग काढणे अवघड जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

असे राहा सतर्क

कोणतीच बँक ग्राहकाला संपर्क साधून कार्डबद्दल माहिती विचारत नाही. शक्यतो असे फोन आल्यास सतर्क होऊन उलट प्रश्न करा. अशा फोनची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा. आपण फसवले गेलो नसलो तरी इतर दुसरा कोणी फसवला जाऊ नये म्हणून एवढी तर जबाबदारी आपली बनतेच. 

फसवणुकीचा मुख्य प्रकार संपर्क साधून बँक अधिकारी असल्याचे भासवले जाते. एटीएम कार्डवरची माहिती विचारली जाते. यामध्ये कार्ड नंबर, सीवी नंबर, समाप्ती डेट, कार्डवरची नाव व पासवर्ड विचारला जातो. ही माहिती मिळवताच हे भामटे ऑनलाइन शॉपिंग किंवा बनावट कार्ड बनवून खात्यातील रक्कम लंपास केली जाते. त्यानंतर ज्या नंबरवरून 
संपर्क साधण्यात आला होता ती सिम कायमचे बंद करण्यात येते. 

असा होतो फसवणुकीचा संवाद

तोतया अधिकारी : नमस्कार सर, मी     अमुकअमुक बँक केअर कंपनीकडून बोलत आहे. 
खातेदार : हा बोला. 
तोतया अधिकारी : सर, आपण अमुक बँकेचे एटीएम वापरता का? 
खातेदार : हो वापरतो. 
तोतया अधिकारी : सर, बरेच दिवस आपण आपल्या बँकेत जाऊन त्याच्या समाप्ती तिथीबाबत माहिती घेतलेली नाही, त्यामुळे ते बंद होऊ शकते. याबाबत मी आपणास माहिती देण्याकरिता संपर्क साधला होता. आपण आपले एटीएम हातात घ्या आणि विचारतो ती माहिती द्या. मी आपणास सांगू शकतो की, आपल्या एटीएमचा कालावधी किती आहे. 
खातेदार : चालेल, पण आमच्या बँकेने आम्हाला स्पष्टच सांगितले आहे, असे फोन खोटे असतात म्हणून?
तोतया अधिकारी : हो आम्हीच सांगत होतो, पण तुम्ही बँकेत खूप दिवस आले नसल्यामुळेच हा कॉल करावा लागला. 
खातेदार : ठीक आहे. बोला काय माहिती देऊ?

अशा प्रकारे संवादाच्या जाळ्यात फसवून भामटे हवी ती माहिती मिळवतात व त्या खात्यावरील रक्कम क्षणात काढून घेतात किंवा ऑनलाइन महाग वस्तू खरेदी करतात. यामुळे सामान्यांच्या कष्टाची कमाई अशी क्षणात हस्तांतरित होत असून शहरातही अशा प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे.