Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Pune › शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता

शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड करून समितीची स्थापना शनिवारी (दि.19) होणार्‍या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. या समितीवर कोणाची निवड होते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध विषय समितीप्रमाणे या समितीवर 9 नगरसेवकांना सधी दिली जाणार आहे. समिती स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 5 मे रोजीच्या पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यामुळे शनिवारच्या सर्वसाधारण सभेत समितीची स्थापना होणार आहे. समितीमध्ये  पक्षीय नगरसेवकांच्या बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या 1 सदस्य असणार आहेत. 

समितीवर संधी मिळावी म्हणून इच्छुक नगरसेवकांनी स्थानिक पक्षनेत्यांसह मुंबईतील राज्यपातळीवर नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. समितीवर वर्णी लागावी म्हणून खालपासून वरपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. या हालचालीना अधिक वेग आला आहे.सभेच्या आदल्या दिवशी उद्या शुक्रवारी (दि.18) नावे निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहेत. सत्ताधारी भाजपामधून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व निष्ठावंत या गटातून किती जणांना संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. क्षेत्रीय कार्यालय समिती स्वीकृत सदस्यपदासाठी डावल्याने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे पक्षाची शहरात नाहक बदनामी झाली. या प्रकारे नगरसेवक नाराज होणार नाहीत, याची दक्षता सत्ताधार्‍यांना घ्यावी लागणार आहे.

तसेच, सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपमधून काहीनी ‘फिल्डींग’ लावली गेली आहे. सभापतीपद कोणत्या गटाकडे जाते, त्या वरून समितीवर कोणत्या नेत्याचे नियंत्रण राहणार हे स्पष्ट होणार आहे. 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने समितीवर सदस्यपदासाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले आहेत. त्यातील तिघांची नावे पक्षनेते अजित पवार निश्‍चित करणार आहे. ही नावे सर्वसाधारण सभेत महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केली जाईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

शिक्षण क्षेत्राची आवड असणार्‍या नगरसेवकांनी संधी

शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या नगरसेवकांना समितीवर सदस्य म्हणून प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, त्यांनी पूर्वी शिक्षण क्षेत्रात काम केलेले असावे. ते शिक्षक किंवा प्राध्यापक असावेत. पालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्याची तळमळ असलेले नगरसेवकांना समितीवर संधी दिली जाणार आहेत. ही नावे उद्या (शुक्रवारी) निश्‍चित होऊ शकतात, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.