होमपेज › Pune › अवैध धंदेवाल्यांमध्येही उत्सुकता

अवैध धंदेवाल्यांमध्येही उत्सुकता

Published On: Apr 25 2018 2:01AM | Last Updated: Apr 25 2018 1:17AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबत सर्वस्तरांमध्ये उत्सुकता दिसू लागली आहे. देहूरोड पोलीस हद्दीत गुन्ह्यांचा तपास मागील काही वर्षात नगण्य आहे. आता शहर पोलीस ठाण्यात समाविष्ट झाल्यानंतर या तपासाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. मात्र, या सकारात्मक बाबींबरोबरच काही नकारात्मक गोष्टीही यानिमित्ताने समोर येऊ लागल्या आहेत. यात प्रामुख्याने अवैध धंदे करणार्‍यांचा समावेश आहे. नवीन पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आपलया अवैध धंद्यांचा बाजार पुन्हा फुलवण्यासाठी हे व्यवसायिक सध्या तयारीला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

ग्रामीण पोलीस अधिक्षक पदाची सूत्रे हाती घेताच महंमद सुवेज हक यांनी अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या. अवैध धंद्यांवर कडक पावले उचलण्याबरोबरच अशा धंदेवाल्यांना मदत करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनाही कायद्याचा इंगा दाखविण्यात आला. त्यामुळे अवैधधंद्यांची नगरी म्हणून पंचक्रोशीत कुख्यात बनलेल्या देहूरोड शहरातील अनेक व्यवसायिकांना आपला गाशा गुंडाळावा लागला. शासन मान्यता मिळाल्याप्रमाणे भररस्त्यावर मटका दुकाने, जुगाराचे अड्डे मांडले जाऊ लागले होते.

मात्र, हक यांनी या प्रकारांना पायबंद घातला. पोलीस अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने अजुनही चोरी चोरी-चुपके चुपके काही बड्या धेंडांचे धंदे सुरू आहेत, पण बहुतांश धंद्यांना चाप बसला, हे खरे.एक मे रोजी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा कारभार सुरू होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. नागरिकांना या आयुक्तालयाची तसेच शहरात सुरू होणार्‍या पोलीस ठाण्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. नागरिकांच्या उत्सुकतेप्रमाणेच शहरातील अवैध दारू, मटका, ग्रामीण भागातील वेश्या व्यवसाय, जुगार चालविणार्‍या धंदेवाल्यांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अगदी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांपासून ते कर्मचारी संख्येपर्यंत गणिते मांडण्यात हि मंडळी व्यस्त आहेत. देहूरोडला कोण अधिकारी येणार तो कसा आहे, किती द्यावे लागतील, याबाबत या धंदेवाल्यांची खलबते सुरू असल्याचे सर्रास चित्र आहे. काहीजणांनी तर आतापासूनच आपल्या धंद्यासाठी जागा निश्‍चित करण्यास सुरूवात केली आहे.  जाणकार कर्मचार्‍यांना शोधून कामावर येण्याबाबत निरोप दिले जाताहेत. एकंदरीतच पोलीस अधिक्षक यांच्या बडग्यामुळे गेली अडीच वर्षे वैतागलेल्या या धंदेवाल्यांना शहरात अभय मिळेल अशी आशा आहे. अर्थात, ते कितपत त्यांच्या पथ्यावर पडेल हे आगामी काळच ठरविणार आहे. मात्र, ओळखी काढुन सेटींग लावण्यात काहीजण गुंतले आहेत, हे मात्र नक्की. 

Tags : Pimpri, Curiosity, among, illegal, businesses