Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Pune › सुसंस्कृत भाजपने खेळले जातीचे कार्ड

सुसंस्कृत भाजपने खेळले जातीचे कार्ड

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:56AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदावरून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत जातीचे कार्ड खेळले गेले. पक्षाच्या आदेशाला झुगारून ओबीसी वर्गातील विशिष्ट समाजाच्या नगरसेवकालाच महापौरपद द्यावे, म्हणून जाहिरपणे मागणीही गेली गेली. त्यामुळे सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या भाजपच्या शिस्तीला तडा गेला आहे.  

शिस्तबद्ध व सुसंस्कृत भाजपमध्ये पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम समजला जातो; मात्र ओबीसीसाठी राखीव असलेले महापौरपद विशिष्ट जातीच्या नगरसेवकाला मिळावे म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडे मागणी करीत थेट आव्हान दिले. अन्यथा येत्या निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. दुसर्‍या गटाचा एका इच्छुक नगरसेवकाने तर, सुमारे 30 नगरसेवकांना सोबत घेऊन मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना गळ घातली; मात्र ही पद्धत पक्षविरोधी असल्याने सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली. त्यामुळे सत्ताधार्‍यांमध्ये गटतटाचे पुन्हा दर्शन झाले.  भाजपची फेबु्रवारी 2017 ला प्रथमच पालिकेत सत्ता आली. त्यामध्ये शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा मोलाचा वाटा आहे. ठरल्यानुसार महापौरपद आ. लांडगे गटाला आणि स्थायी समिती अध्यक्षपद जगताप गटाकडे आहे. हे समीकरण पंचवार्षिकेतील दुसर्‍या महापौर निवडीतही कायम राहिले. 

आ. लांडगे गटाचे जाधव यांच्या नावाला मुख्यमत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्यांनी ‘हिरवा कंदील’ दिला. प्रथम महापौर नितीन काळजे यांच्या वर्णी लावल्यानंतर समर्थक राहुल जाधव यांची निवड करून आ. लांडगे यांनी पक्षातील विरोधकांना ‘धोबीपछाड’ दिला. त्यातून त्यांनी शहर नेतृत्वासाठी आपणही सक्षम असल्याची दाखवून दिले आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापौर निवडीला महत्व प्राप्त झाले आहे. भोसरी मतदारसंघातील मोशीतील ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आता नव्या महापौरांच्या हस्ते होणार आहे; तसेच पंतप्रधान आवास योजनेतील वडमुखवाडी, चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पही भोसरी मतदार संघात आहेत. त्या कामाचे भूमिपूजनही नव्या महापौरांकडून केले जाईल.  

भाजपचे समाविष्ट गावाला झुकते माप

महापौरपद आणि  विविध विषय समिती सभापतीपद समाविष्ट गावातील नगरसेवकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपचा कल समाविष्ट गावाकडील विकासाकडे अधिक दिसत आहे. प्रथमच चिखलीच्या नगरसेवकाला महापौर तसेच, विरोधी पक्षनेत्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील विकासकामांचा झपाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चर्‍होलीतील माजी महापौर नितीन काळजे यांनी समाविष्ट भागांतील म्हणजे चर्‍होली, मोशी, चिखली परिसरात तब्बल 850 कोटींपेक्षा अधिक खर्चाची कामे मार्गी लावली आहेत. आता, राहुल जाधव हेही समाविष्ट गावातील विकासावर लक्ष देणार असल्याने भविष्यात चर्‍होली, मोशी, चिखली हा परिसर पिंपळे सौदागर व वाकडप्रमाणे स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट राहुल जाधव यांच्यासमोर आहे.