होमपेज › Pune › सेन्सॉर समितीवर नेमणूकीसाठी ‘क्रायटेरिआ’ हवा

सेन्सॉर समितीवर नेमणूकीसाठी ‘क्रायटेरिआ’ हवा

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:17AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सध्या काही मराठी, हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावरून अनेकदा वादंग निर्माण होत आहे. असे का होते? याचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या सेन्सॉर बोर्डावर नेमणूक करण्यात आलेले काही पदाधिकारी हे कोणत्या ना कोणत्या बड्या हस्तीच्या जवळचे आहेत. त्यांना चित्रपट क्षेत्राविषयी काहीही ज्ञान नाही. अज्ञानामुळे आणि व्यवस्थितरित्या परीक्षण न केल्यामुळे सेन्सॉरकडून कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली जाते आणि चांगल्या चित्रपटांना ‘कट’ मारला जातो. त्यामुळे सेन्सॉरच्या समितीवर पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे निकष लावणे आवश्यक आहे, असे चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तज्ज्ञ यांच्याकडून मत व्यक्त होत आहे.

दर पाच वर्षांनी सेन्सॉर बोर्डावर सदस्यांची नेमणूक केली जाते. मात्र, या निवडीमध्ये पारदर्शकता राहिली नसल्याचे देखिल पाहायला मिळत आहे. बोर्डावर नेमणूक करण्यात आलेले बरेचसे पदाधिकारी कोणत्या ना कोणत्या मंत्री, बड्या अधिकारी यांचे पाहूणे किंवा मर्जीतलीच माणसे आहेत. समितीवर नेमणूक तज्ज्ञ लोकांची व्हावी आणि त्यासाठी त्यांना चित्रपटसृष्टीतील अनुभव असायला हवा. त्यामुळे चांगले चित्रपट प्रदर्शित होऊन चित्रपट रसिकांना उत्तमोत्तम चित्रपट पहायला मिळतील. असे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रतिवर्षी अनेक चित्रपट निर्माण केले जातात. मात्र, सर्वच प्रदर्शित होतात, असे नाही. काही चित्रपटांची पात्रता नसतानाही ते चित्रपट सर्रास प्रदर्शित केले जातात. आणि काही चित्रपटांची पात्रता असतानाही त्यांना कट मारला जातो. गुणवत्तेनुसार चित्रपट प्रदर्शन व्हायला हवे, परंतु, तसे होत नाही. यात प्रत्येकजण आपापले हीत संबंध पहातो, तसेच पैशांची देवाणे-घेवाण यांसारखे अनेक प्रकार होत असल्याचे दाट संशय असल्याचा आरोपही चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.सेन्सॉरशिप लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करावी. तसेच निर्मात्याला चित्रपटाला सेन्सॉरशिप मिळावी, याकरिता खूपच खर्च करावा लागत आहे. तो कमी करावा, अशीही सूचना त्यांनी केली.