Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Pune › दूषित पाण्याचे १९० गावांवर संकट

दूषित पाण्याचे १९० गावांवर संकट

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 1:13AMपुणे : नरेंद्र साठे

जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 7 टक्के नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली. जिल्ह्यातील 190 गावांमध्ये दूषित पाणी असल्याचे नमुने आढळून आले असून, यामध्ये सर्वाधिक प्रमाण शिरूर तालक्यातील 37 गावांमध्ये दूषित पाणी आढळले आहे. कडक उन्हाळ्यात 190 गावांवर दूषित पाण्याचे संकट आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील पाण्याचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासल्यानंतर अहवाल तयार करण्यात येतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 2 हजार 674 गावांमधील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामधील पाण्याचे 254 नमुने दूषित असल्याचे आढळू आले होते. मार्च महिन्यात 2 हजार 597 गावांतील पाण्याच्या नुमन्यांची तपासणी करण्यात आली होती. यामधील 190 गावांमध्ये पाणी दूषित असल्याचा अहवाल आला आहे. शिरूर तालुक्यात सर्वाधिक गावांत दूषित पाणी अढळले असून, त्याखालोखाल खेड तालुक्यातील 32 गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले. खेडमधील 274 गावांतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. 

203 गावांमधील ब्लिचिंग पावडरचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एका गावामध्ये ब्लिचिंग पावडरमध्ये 20 टक्केपेक्षा कमी क्‍लोरिन असल्याचे आढळून आले नाही. पाण्याच्या शुद्धतेसाठी ‘टीसीएल’चा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यामध्ये क्लोरिनचे 33 टक्के प्रमाण हे आदर्श मानले जाते. क्लोरिनचे त्यापेक्षा कमी प्रमाण असल्यास त्याचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो.

दूषित पाणी पिल्याने कोणते आजार होतात?

दूषित पाणी पिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते.

दूषित पाणी असलेल्या गावांची संख्या

आंबेगाव -27, बारामती-2, भोर-9, दौंड-13, हवेली-11, इंदापूर-9, जुन्नर-31, खेड-32, मावळ-5, मुळशी-2, पुरंदर-5, शिरूर-37, वेल्हे 7.