Sun, Aug 25, 2019 00:04होमपेज › Pune › पोलिसाला सराईतांची जबर मारहाण

पोलिसाला सराईतांची जबर मारहाण

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र प्रिव्हेन्शीव्ह डेंजरस अ‍ॅक्टीव्हीटीनुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिस कर्मचार्‍याला जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्वी केलेल्या कारवाईच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. हडपसर परिसरातील सासवड रोडवर शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

नितीन उर्फ पप्पू भीमराव डोके (वय 28) आणि बाळू भीमराव डोके (वय 32 , दोघेही रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिस नाईक प्रताप हनुमंत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक प्रताप गायकवाड आणि त्यांचे सहकारी शिवले हे दोघे गस्तीवर होते. सासवड रस्त्यावर फुरसुंगी येथे रोहित वाईन्स या दुकानासमोरील रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे गायकवाड आणि शिवले काय झाले हे पाहण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी दोघेजण रस्त्यात थांबून येणार्‍या जाणार्‍यांना शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देत होते. त्यांच्या दहशतीने परिसरातील नागरिक दुकाने बंद करत होती. गायकवाड यांनी दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे ओळखले तसेच, त्यांना शांत होण्यास सांगितले.

त्यावेळी बाळू आणि पप्पू या दोघांनी गायकवाड यांना ‘तू आमच्यावर यापूर्वीही कारवाई केली होती? आता तुला सोडत नाही’ असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. तसेच, एकाने हात धरून दुसर्‍याने गायकवाड यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना रक्तबंबाळ केले. भर रस्त्यात पोलिसाला मारहाण सुरू झाल्याने गोंधळात आणखीनच भरली पडली. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान नागरिकांनी हडपसर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन दोघांना पकडले. 

दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपी नितीन याच्यावर 6 तर बाळू याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर एमपीडीए तसेच तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान सांगवीत एका कर्मचार्‍याला धमकावण्यात आले असताना आता हडपसरमध्ये पोलिसाला भररस्त्यात मारल्याने पोलिसच असुरक्षित असतील नागरिकांचे काय असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

 

Tags : pune, pune news, crime, policeman, Criminals,