Thu, Apr 25, 2019 07:37होमपेज › Pune › सराईतांचा लुटमारीचा नवीन फंडा

सराईतांचा लुटमारीचा नवीन फंडा

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील गुन्हेगारांनी आता चोर्‍या-मार्‍या करण्यासाठी नवीन फंडा अवलंबने सुरू केले आहे. स्वारगेट परिसरात रिक्षा घेऊन उभा राहत दहा रुपयांमध्ये लांब पल्ल्याच्या ठिकाणी सोडण्याच्या आमिषाने  दोन सराईत लुटत आहेत. रविवारी दुपारी चौघांना दहा रुपयांमध्ये पुणे स्टेशन परिसरात सोडण्याच्या बहाण्याने अर्ध्या वाटेत रिक्षा थांबवून शिवीगाळ करत लुटले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिघा सराईतांना अटक केली आहे. 

विजय हरिभाऊ कुंभार (वय 30, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर), बाळासाहेब ऊर्फ संदीप रामदास दारू (वय 48, रा. आंबेगाव पठार) आणि राजेंद्र गणपत साळेकर (वय 42, रा. नर्‍हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इमाम शिपाई (वय 39, रा. वदवली, वाई. मुळ. पश्‍चिमबंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  इमाम शिपाई व त्यांचे तीन मित्र हे वाई येथील वदवली गावात बीएसएनएल कंपनीचे टॉवर बसविण्याचे कामे करतात. ते मुळचे पश्‍चिम बंगाल येथील आहेत. दरम्यान ते सणाच्या गावी निघाले होते.

त्यामुळे वाईहून स्वारगेट परिसरात रविवारी दुपारी आले. त्यावेळी आरोपी कुंभार याने त्यांना पुणे स्टेशन येथे केवळ प्रत्येकी दहा रुपयांमध्ये सोडतो असे सांगितले. त्यानुसार, स्वारगेट येथून आरोपीने त्यांना रिक्षा बसविले. तो त्यांना सेव्हन लव्हज् चौकात घेऊन उलटे डायस प्लॉटकडे घेऊन गेला. जाताना त्याने इतर रिक्षा चालकांना रिक्षात घेतले. क ॅनॉलजवळ गेल्यानंतर चौघांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करून त्यांच्याकडून आरोपींनी साडेतीन हजार रूपये व इतर ऐवज काढून घेतला. त्यांना त्या ठिकाणी सोडून पसार झाले.

त्यावेळी चौघांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच, त्यांनी रिक्षाचा क्रमांक देखील सांगितला. त्यानुसार पोलिस निरीक्षक मच्छींद्र पंडीत, उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या पथकाने रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी रिक्षा चालक कुंभार व वारू सापडले. चौकशी केल्यानंतर एकाची माहिती मिळाली. कुंभार व आरू हे सराईत आहेत. त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे रिक्षात प्रवाशी घेऊन नागरिकांना लुटले आहे. कुंभार याच्यावर लुटमार, दरोड्याची तयारी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तर, आरूवर तीन गुन्हे दाखल आहेत. परराज्यातील व्यक्ती लुटमार केल्यानंतर तक्रार देत नाहीत. त्यामुळे आरोपी परराज्यातील व्यक्ती पाहून त्यांना पहाटेच्या वेळी लुटत असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट परिसरातच सराईत रिक्षा घेऊन थांबलेले असतात.