Tue, Feb 19, 2019 22:26होमपेज › Pune › दोन गुन्हे दाखल असणारे होणार ‘तडीपार’?

दोन गुन्हे दाखल असणारे होणार ‘तडीपार’?

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:35PMपिंपरी : अमोल येलमार

शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे महत्त्वाचे असते. याचाच एक भाग म्हणून पिंपरी पोलिस ठाण्यात नोंद असणार्‍या सराईत गुन्हेगारांवर ‘तडीपार’ची कारवाई करण्यासाठी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मारहाणीचे दोन गुन्हे आणि एक अदखलपात्र गुन्हा दाखल असल्यास त्या गुन्हेगाराचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नवनियुक्त पोलिस निरीक्षकांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय होत आहे. यातच पोलिसांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगार पोलिसांना डोईजड झाले आहेत. त्यामुळे भरदिवसा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. गोळीबार, खून, लुटमार, दहशत माजवणे, राडा करणे यांसारखे प्रकार होत आहेत. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. नुकत्याच पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपल्या कामाची पद्धत राबवत आहेत. परिमंडळ तीनमध्ये चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

पिंपरी पोलिस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शरीराविरोधातील दोन गुन्हे आणि एक अदखलपात्र गुन्हा (एनसी) असणार्‍या गुन्हेगारांची वेगळी यादी तयार करून दोन दिवसांमध्ये देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

दोन गुन्हे आणि एक ‘एनसी’ असणार्‍यांवर तडीपार कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. हद्दीतील गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी सर्वांत पहिले तडीपारचे पाऊल उचलले असल्याचे दिसत आहे. वाकड पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक असताना जाधव यांनी राजकीय दबावाला न जुमानता निवडणुकीच्या काळात एका टोळीला तडीपार केले होते. यामुळे त्या परिसरातील निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या. यामुळे पिंपरी पोलिस ठाण्यात सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता गुन्हे दाखल असणारे गुन्हेगार तडीपार होतील, असे एकंदरीत चित्र आहे.