Mon, Apr 22, 2019 11:46होमपेज › Pune › गुन्हे शाखेत गुणवत्तेपेक्षा ‘आर्थिक’ खेळ!

गुन्हे शाखेत गुणवत्तेपेक्षा ‘आर्थिक’ खेळ!

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMपुणे : देवेंद्र जैन

पोलिस दलात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या गुन्हे शाखेत सध्या गुणवत्तेपेक्षा ‘आर्थिक गुणांचा’ आकडाच प्रबळ ठरत असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू असून, यासंदर्भात अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘पुढारी’कडे स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.सद्यःस्थितीत शहरातील गुन्हे शाखेत झालेल्या बदल्या पाहिल्यास, या विभागात काही जणांनी आपली मक्तेदारी कायम केली असून, वर्षांनुवर्षे याच ठिकाणी नेमणुकीस राहण्याचा विक्रम काही जणांच्या नावावर जमा झाल्याचे दिसते आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या गुन्हे शाखेत नामांकन मिळावे, यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. गुन्हे  शाखा  म्हणजेच ‘क्राइम ब्रँच’चा दरारा सर्वमान्य आहे. शहरात वाढलेल्या चोर्‍या, चेन स्नॅचिंग, खून, बलात्कार, व दिवसाढवळ्या गोळीबारांच्या वाढत असलेल्या घटना बघितल्यानंतर ही शाखा नेमके काय काम करते, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडत आहे. काही काळापूर्वी ‘क्राईम ब्रँच’चे नाव ऐकल्या-ऐकल्या गुन्हेगारांची पळताभुई थोडी व्हायची. आता हे अट्टल गुन्हेगार कोणालाच दाद देत नसल्याचे दिसते. पोलिसांमधील वाढती रस्सीखेच या शाखेला रसातळाला नेण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अनेकांचे मत आहे. 

निकषच राहिले नाहीत

पूर्वी या शाखेत नेमणूक करताना संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचा पूर्वइतिहास तपासून घेतला जात असे. गुन्हेगारांवर जरब असलेल्यांना येथे काम करण्यास प्राधान्य दिले जाई. पण जसा काळ बदलत  गेला, तशी सर्वच व्यवस्था बदलत गेली. गुन्हेगारांवर जरब बसवण्याऐवजी आर्थिक उलाढालींनाच स्थान मिळू लागले. पोलिस स्थानकांपेक्षा गुन्हे शाखेत नेमणूक होण्यासाठी ‘कोटींच्या कोटींची’ उड्डाणे सुरू झाली. याचा फटका पोलिसांबरोबरच सर्वसामान्य जनतेला बसू लागला. निनावी अर्जावर व्यापारी, गुंड, बांधकाम व्यावसायिकांना बोलावणे जाऊ लागले व मोठी मांडवली करून, त्यांना सोडले जाऊ लागले. ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ या न्यायाने कोणाचीच तक्रार न उरल्याने प्रकरणे दडपली जाऊ लागली, अशी निरीक्षणे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर नोंदविली.

अनुभवी अधिकारीच ‘साईड ट्रॅक’

सद्यःस्थितीत शहरात गुन्हे शाखेची पाच, दरोडा प्रतिबंध, प्रॉपर्टी, वाहन चोरी, सामाजिक सुरक्षेसाठी प्रत्येकी एक, गुंडा स्कॉड दोन अशी पथके आहेत. सहायक पोलिस आयुक्त दोन, पोलिस उपायुक्त व अतिरिक्त पोलिस आयुक्त, अशी रचना आहे. गुन्हे शाखेतील  फक्त काही पथकेच आपली कार्यक्षमता वेळोवेळी सिद्ध करत आली आहेत. आजही आयुक्तालयात भरपूर अनुभवी अधिकारी व कर्मचारी आहेत, ज्यांना नेहमीच डावलले जात आले आहे. याचे ताजे उदाहरण एका ‘लेडी सिंघम’बाबत देता येऊ शकते. जिने आपल्या कारकिर्दीत नेहमी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता जिवाचे रान केले आहे. या ‘लेडी सिंघम’ने जिथे जिथे काम केले, तेथे गुंड, चोरच काय, राजकीय  नेतेसुद्धा  पोलिसांच्या भानगडीत पडत नसत. मात्र, याही अधिकार्‍याला पुणे येथे बदलून आल्यावर, परदेशी लोकांना भेटण्याचे काम देण्यात आले आहे. यावरून पोलिसांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विभाग समजल्या जाणार्‍या गुन्हे शाखेची काय अवस्था झाली आहे, हे लक्षात येते.