Sun, May 26, 2019 12:38होमपेज › Pune › अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची ‘क्रेझ’

अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची ‘क्रेझ’

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:17AMपिंपरी :  संतोष शिंदे

पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात टोळ्या सध्या शांत असल्या तरी कोवळ्या भाईगिरीला मात्र मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. वाहनांच्या तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग जास्त असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या या कोवळ्या गुंडांवर अंकुश ठेवणे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे. 

पिंपरी- चिंचवड शहरात नुकत्याच उदयास आलेल्या काही किरकोळ टोळ्यांचे अपवाद वगळता हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेले नामचीन गुंड या टोळ्यांचे नेतृत्व करीत आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस दप्तरी तीन प्रमुख टोळ्यांची नोंद आहे. त्यातील पिंपरीतील टोळीचा म्होरक्या काही महिन्यांपासून तुरुंगवासात आहे.

त्याच्या पिलावळीवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याने त्यांनी देखील अलीकडच्या काळात संयमाची भूमिका घेतली आहे. पिंपरीतील याच टोळीतून विभक्त होऊन उदयास आलेल्या टोळीने सध्या ’व्हाईट कॉलर’ धोरण स्वीकारले आहे. तर भोसरीतील तिसर्‍या क्रमांकाच्या एका टोळीच्या म्होरक्याचा पूर्णानगरमध्ये गोळ्या झाडून खून करण्यात झाला. टोळीचा सरदारच गेल्याने त्या टोळीतील खलबतं शांत झाली आहेत. या व्यतिरिक्त शहरातील आणखी काही सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी मुस्कटदाबी केली. एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात नामचीन मंडळींवर वचक ठेवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

परंतु गेल्या दीड ते दोन वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चालले आहे. मिसरूड न फुटलेल्या अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची ’क्रेज’ मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली आहे. या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा नवीन ’फंडा’ या गुन्हेगारी विश्वात येऊ लागला आहे. भर रस्त्यावर नंग्या तालवारींचा नाच करीत रस्त्यावर पार्क असलेल्या गाड्या फोडणारी मुलं कुठल्याही गँगशी जोडलेली नाहीत. बहुतांश मुलांचे कसलेही रेकॉर्ड पोलीस ठाण्यात नसल्याने पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. अशा तोडफोड प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग हि विशेष बाब आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत सजग राहण्याची गरज आहे. 

फेसबुकचा गैरवापर वाढत्या गुन्हेगारीचे मूळ आहे. अलीकडच्या काळात ’आऊट डोअर’ फोटोग्राफीचा नवा ट्रेंड बाजारात सुरु झाला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी फेसबुकवर दहशत निर्माण करण्यासाठी असे एडिट केलेले फोटो वापरले जातात. हातात कोयता,तलवार,बनावट पिस्तूल घेऊन फोटो काढले जातात. ’विलन लूक’ येण्यासाठीचा मेकअप देखील जातो व अशा फोटो फोटोखाली समाजात दहशत पसरेल अशी फिल्मी डायलॉग टाईप करून बिनधास्त अपलोड केले जातात. मग सुरु होतो लाईक, कमेंटचा खेळ. ज्याला जितक्या लाईक अन कमेंट तितकी त्याची दहशत असा सरळ तर्क काढला जातो. यातूनच फेसबुकवर ग्रुप तयार होतात. अन त्यांच्यातील वैर वाढत जाते. नुकतेच चिंचवड येथील दोघांचा खून झाला परंतु या खुनानंतर फेसबुकवर धुसफूस सुरु आहे.

याकडे सायबर सेलचे अजिबात लक्ष नाही. अशा फेसबुक गुंडाना वेळीच आवर घातल्यास भविष्यात होणार्‍या गुन्हेगारी कारवायांना आवर घालणे शक्य आहे. पोलिसांचे गोपनीय आणि निगराणी पथक सराईत गुन्हगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष  ठेऊन आहे. मात्र या नवख्या गुन्हगारांचे रेकॉर्ड नसल्याने कारवाई करताना अनेक अडचणी येत असल्याचे पोलीस अधिकारी उघडपणे सांगतात. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या तोडफोड प्रकारांमुळे पिंपरी चिंचवडकर पुरते वैतागले आहेत. घरसमोर गाडी पार्क करण्यास देखील नागरिकांना भीती वाटू लागली आहे. पोलीस येत्या काळात या कोवळ्या गुंडांचा वारू कसा रोखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.