Mon, Oct 21, 2019 03:37होमपेज › Pune › मांगूर माशांची शेती करणार्‍यांवर गुन्हे

मांगूर माशांची शेती करणार्‍यांवर गुन्हे

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:53AMभिगवण : भरत मल्लाव

उजनी धरण परिसरात इंदापूर तालुक्यात मांगूर (थाय मांगूर) माशाची बेकायदेशीर शेती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत. या माशांची शेती नष्ट करण्याच्या लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत दै. ‘पुढारी’ने गेल्या तेरा-चौदा वर्षांपूर्वीच मांगूर माशांची शेती वाढत असल्याचा धोक्याचा इशारा वृत्त प्रसिद्ध करून दिला होता. मात्र याकडे राज्यातील तत्कालीन अधिकार्‍यांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी अलीकडे बेकायदेशीर शेती करण्यात वाढ झाली होती. मात्र आता कारवाई सुरू झाल्याने मांगूर माशांची शेती करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.केंद्र व राज्य शासनाची बंदी असतानाही मांगूर जातीच्या माशांची बेकायदेशीर शेती फोफावू लागल्याने राज्यात पहिल्यांदाच पुणे मत्स्य विभागाने अशी शेती करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम शिरूर तालुक्यातून हाती घेतली आहे.   

मनसेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव यांनी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यावरून सहाय्यक आयुक्त विजय शिखरे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले यांनी शिरूर तसेच इंदापूर तालुक्यातील भिगवण, कालठण, वांगी आदी भागात अशी बेकायदेशीर शेती करणार्‍या ठिकाणांना जलसंपदा अधिकार्‍यांसह भेटी देत शेती नष्ट करण्याच्या नोटिसा गेल्या महिन्यापूर्वी दिल्या होत्या. मात्र तरीही याकडे दुलर्क्ष करून शेती सुरूच ठेवण्यात आल्याने मत्स्य विभागाने शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीत थेट 13 जणांविरुद्ध नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता उजनी भागात तसेच इंदापूर तालुक्यात इतरत्र या माशांचे संवर्धन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त विजय शिखरे यांनी सांगितले की, मांगूर माशांची शेती करण्यावर भारतातच कायद्याने बंदी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अशी शेती असेल तेथे गुन्हे दाखल करण्यात येणारआहेत. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19