Tue, Apr 23, 2019 14:16होमपेज › Pune › खरी पिस्तुले झाली खेळणी

खरी पिस्तुले झाली खेळणी

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:40AMपिंपरी : अमोल येलमार

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेेंदिवस वाढत आहे. परराज्यांतून शहरात राजरोसपणे पिस्तुले येत आहेत. पोलिस खात्यातील ‘पिस्तूल मॅन’ म्हणून ओळखले जाणार्‍यांनी आपल्या खबर्‍यांना सतर्क करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी टोळी युद्धातून रावणसेना टोळीच्या प्रमुखाचा गेम वाजवण्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणला होता. याची माहिती मिळाल्याने हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून तो साठा जप्त केला होता. याच टोळीवर रावणसेना टोळीने गोळीबार केला होता. हा प्रकार देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. याचबरोबर अधूनमधून बेकायदेशीर पिस्तुले सापडत असतात. 

सप्टेंबर महिन्यात पिंपरी कॅम्प परिसरातील साधू वासवानी उद्यानाजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या काळेवाडी येथील सराईत गुन्हेगार संतोष कुरावत याच्यावर टोळक्याने गोळीबार केला. या घटनेला 24 तास होत नाहीत, तोवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गवळीमाथा येथे हॉटेल चालविणार्‍या विजय पांडुरंग घोलप याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी जाऊन गोळीबार करण्याचे धाडस गुन्हेगारांचे वाढलेले आहे, तेही जवळ बेकायदेशीर पिस्तुले, हत्यारे बाळगून. यापूर्वी शहरात अनेकदा गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. गोळीबार करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी गुन्हेगार बेकायदेशीर पिस्तुलांचा वापर करतात. 

शहरात बाहेरच्या राज्यांतून येत आलेल्या गुन्हेगारांची संख्या वाढत असून, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलिस नेहमी फक्त रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवतात. याचाच गैरफायदा घेत हे गुन्हेगार पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. आजही शहरातील अनेक गुन्हेगारांकडे बेकायदेशीर पिस्तूल आहेत; मात्र कारवाई करायची कोणी, यामुळे सर्व काही राजरोस सुरू आहे. बाहेरच्या राज्यांतून आणलेली पिस्तुले 10 हजारांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत अगदी सहज उपलब्ध होत आहेत. 

खंडणीविरोधी पथकाने मध्यंतरी मोशी येथे एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, हा मोशी येथे एका ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील असून, त्याचा पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे समोर आले होते. पोलिसांना कधीही वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारणा केली असता, ‘आम्ही ही कारवाई केली, एवढ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली, एवढ्या गुन्हेगारांची कसून तपासणी केली, त्यांची घरझडती घेतली, एवढी हत्यारे मिळालेली आहेत,’ असे सांगितले जाते. एवढे सगळे पोलिस करत असताना मग पिस्तुले येतात तरी कोठून हा प्रश्‍न उपस्थित होतो. 

Tags : pune, pune news,Crime, city, Pimpri-Chinchwad, increasing day by day