होमपेज › Pune › पाच हजार आंदोलकांवर गुन्हा

पाच हजार आंदोलकांवर गुन्हा

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:39AMचाकण : वार्ताहर

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या चाकण बंदला हिंसक वळण लागून येथील पोलिस ठाण्यावर करण्यात आलेली तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ व मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली तोडफोड आणि पोलिस ठाण्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्लाप्रकरणी मंगळवारी (दि. 31 जुलै) तब्बल 5 हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांसह शिवशाही, हिरकणी अशी 35 वाहने पेटवून देऊन एकुण 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची  माहिती चाकण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत अनंतराव पवार (वय 53, रा. चाकण, ता. खेड ) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 30 जुलै) मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी चाकण बंदसह रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी पाच पीएमपीएमएल बससह चाकण नगरपरिषदेचे एक अग्निशमन वाहन, एसटी महामंडळाच्या 20 गाड्या व अन्य प्रवाशी वाहतूक करणार्‍या 5 गाड्या अशा एकुण 35 गाड्या जाळल्या. यासह 70 ते 80 गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. 

आंदोलनकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी चाकण येथील तळेगाव चौकातील पोलीस चौकी जाळून टाकली. दरम्यान सोमवारी झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेत आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती चाकण सज्जाचे मंडलाधिकारी बाळकृष्ण साळुंके यांनी दिली.

राजगुरुनगर : चाकणमध्ये सोमवारी मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर येथील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मंगळवारी  खेड तालुक्यात पोलिसांनी पथसंचलन केले.

पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष

सोमवारी (दि. 30) झालेल्या मारहाण, दंगल, जाळपोळ घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या असून, पोलिस पथकाने घटना घडलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे, पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते हे स्वतः उपस्थित राहून या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी चाकणमधील वाहतूक सुरळीत झाली असून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौक, नगर परिषदेसमोर पोलिसांच्या एकूण 25 व्हॅन व राज्य राखीव दलाचे 500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घटनास्थळाचे पंचनामे सुरू असून महामार्गावर जळलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आली आहेत. शहरातून पोलिसांनी संचलन केले. चाकण शहरात पोलिसांच्या पिंजरा गाड्या जागोजागी तैनात आहेत. तसेच चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील गावात दिवसा पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 16 पोलिस अधिकारी व कर्मचारी यांसह पुणे ग्रामीणचे तीन आरसीपी पथक, एसआरपी ग्रुप दोन सी कंपनीच्या तीन प्लाटून, एसआरपी ग्रुप एकच्या दोन प्लाटून, कोल्हापूर आरसीपीचे कर्मचारी आणि चाकण पोलिस स्टेशनचे कर्मचारी असे सर्व मिळून 600 ते 700 पोलिस कर्मचारी तैनात आहेत.