Wed, Aug 21, 2019 15:16होमपेज › Pune › व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नगरसेविकेसह ५ जणांवर गुन्हा

व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नगरसेविकेसह ५ जणांवर गुन्हा

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:16AMपिंपरी : प्रतिनिधी

सचिन सुरेश ढवळे (45, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने रविवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी शशिकला ढवळे हिच्यासह भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे, सुनील पालांडे, अभय बिर्जे आणि विक्की शर्मा यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली. त्या आधारे, सचिनचा भाऊ शरद ढवळे यांच्या फिर्यादीवरून या पाचही जणांविरुद्ध पिंपरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

तुकारामनगरमधील टपर्‍यांच्या काळाबाजारातून हा बळी गेल्याची चर्चा आहे. आश्चर्य म्हणजे, शशिकला यांनीच 9 एप्रिल 2018 रोजी सचिन यांना त्रास होत असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे दिली होती. पती सचिन यांना नगरसेविका पालांडे यांच्यापासून धोका असल्याने त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी शशिकला यांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सचिन यांनी लोकांकडून पैसे घेऊन टपर्‍या बनवल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या  अनधिकृत टपर्‍यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. सचिन आणि पत्नी शशिकला त्याची विचारणा करायला गेल्या असता नगरसेविका पालांडे व इतर चौघांनी त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली; तसेच बेदम मारहाण केली. त्या नैराश्यातून सचिन यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

सचिन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नगरसेविका पालांडे, त्यांचे पती व इतर दोन कार्यकर्त्यांसह पत्नी शशिकला यांचेही नाव घेतल्याने यातील गूढ वाढले आहे. पत्नीचा यामध्ये काय संबंध, याचा शोध पोलिस घेत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले. दरम्यान, सचिन यांनी आत्महत्येपूर्वी  लिहून ठेवलेल्या चिठ्ठीप्रमाणे तपास करावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला या चिठ्ठीबाबत गोपनीयता ठेवल्याचाही आरोप होत आहे.