Tue, Sep 25, 2018 09:03होमपेज › Pune › भाजप नगरसेवक नेवाळेवर तोडफोडप्रकरणी गुन्हा

भाजप नगरसेवक नेवाळेवर तोडफोडप्रकरणी गुन्हा

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी

दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे चिखली परिसरातील नगरसेवक संजय नेवाळे याच्यासह सात जणांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास चिखली येथील शिवतेजनगरमध्ये घडली आहे. 

या प्रकरणी बदाराम भिकाजी देवासी (वय 24, रा. चेरी स्वीट मार्ट, शिवतेजनगर, चिखली. मूळगाव पाली, राजस्थान) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे, सचिन किरवे इतर पाच अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी यांनी आपल्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला होता. रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास नेवाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. यामुळे देवासी यांनी मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप राजस्थानी भाषेत सांगत होते. त्यावेळी नेवाळे यांच्यासोबत आलेली व्यक्‍ती बाजूला उभी होती. त्याने देवासी यांच्या दोन-तीन कानाखाली मारल्या आणि नेवाळे यांना हा तुमच्याबाबत काय सांगतोय बघा, असे म्हणाला. त्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली.

या मारहाणीत गळ्यातील चेन आणि कानातील सोन्याची बाळी पडून नुकसान झाले. हा प्रकार सीसी कॅमेर्‍यात रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या वायरिंगचीही तोडफोड केली. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.