Thu, Sep 20, 2018 18:50होमपेज › Pune › दौंड गोळीबारातील मृत तिघांवर अंत्यसंस्कार

दौंड गोळीबारातील मृत तिघांवर अंत्यसंस्कार

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:53AM

बुकमार्क करा
केडगाव/दौंड : वार्ताहर

राज्य राखीव पोलिस दलातील जवानाने दौंड शहरात गोळ्या झाडून ठार केलेल्या तिघांच्या पार्थिवावर बुधवारी अतिशय कडक बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

मंगळवारी (दि. 16) दुपारी घडलेल्या या घटनेचे पडसाद शहरात बुधवारीही दिसत होते. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेऊन  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे दौंड शहरात तळ ठोकून आहेत. ते मंगळवारी रात्रीच शहरात आले होते.  बुधवारी सकाळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दौंड शहराला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पोलिस आणि अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना केल्या.

गोळीबारात ठार झालेल्या परशुराम गुरुदास पवार (वय 33), गोपाळ काळूराम शिंदे (वय 35, रा. वडारगल्ली, दौंड), अनिल जाधव (वय 30, रा. जिजामातानगर, लिंगाळी) यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात नेले असल्याने अंत्यविधीसाठी दुपारपर्यंत लोक प्रतीक्षेत होते. त्याचा परिणाम शहरातील घबराटीच्या वातावरणावर स्पष्टपणे दिसत होता. अंत्ययात्रेच्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता.

अनिल जाधव यांची अंत्ययात्रा कुरकुंभ मोरीमार्गे आणि परशुराम पवार व गोपाळ शिंदे या दोघांची अंत्ययात्रा एकत्रित मोठ्या जनसमुदायासह शाहू पुतळ्यामार्गे आंबेडकर पुतळ्याजवळून महात्मा गांधी पुतळ्यामार्गे स्मशानाकडे गेल्या. या दोन्ही अंत्ययात्रांच्या पुढे आणि मागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. शिंदे आणि पवार यांच्या अंत्ययात्रांसमोर दौंड-शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे हे जातीने पोलीस कुमक घेऊन होते. पाठीमागे यवतचे पोलीस अधिकारी धन्यकुमार घोडसे,  पोलिस दलाची तुकडी घेऊन चालत होते. 

राखीव दलाकडून चौकशी

दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश मेखला, उपपोलिस महानिरीक्षक संदीप कर्णिक हे राज्य राखीव पोलिस दलाच्या तळावर आलेले असून, त्यांनी मंगळवारी (दि. 16) झालेल्या गोळीबार प्रकरणी चौकशी राखीव दलांतर्गत  सुरू केली आहे. दौंड शहरात ग्रामीण पोलिस विशेष महानिरीक्षक नांगरे पाटील आणि दुसरे राज्य राखीव पोलिस विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश मेखला असे दोन महानिरीक्षक आलेले आहेत.