Thu, Apr 25, 2019 05:38होमपेज › Pune › क्रेडिट कार्ड चोरून ऑनलाईन खरेदी

क्रेडिट कार्ड चोरून ऑनलाईन खरेदी

Published On: May 21 2018 1:35AM | Last Updated: May 21 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी 

दुचाकीला लावलेली बॅग चोरून त्यातील क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पाच वेळा ऑनलाईन खरेदी करून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना दि. 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

गणेश सुदर्शन शिंदे (23, रा. पाटस, ता. दौंड), मारुती विष्णू पोळेकर (19, रा.  पाटस)  आणि नागेश रामा देवकर (रा. पाटस) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सागर मारुती पवार (वय 19, रा. पाटस) हा अद्याप फरार आहे. याबाबत दत्तात्रय पन्नालाल काळे (वय 25, रा. हिंगणेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 6 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. 

काळे हे दि. 6 फेब्रुवारी रोजी राहू रस्त्याने दुचाकीवरून हिंगणेगाव येथे चालले होते. त्यावेळी रस्त्यावर काही कारणास्तव दुचाकी कडेला लावून थांबले असता त्यांच्या दुचाकीला लावलेली सॅक चोरट्यांनी चोरून नेली. त्यामध्ये दीड हजार रुपये रोख, मोबाईलसह महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 

या बॅगमध्ये असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून पाचवेळा ऑनलाईन खरेदी करून काळे यांची फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. 

या प्रकरणी शिंदे, पोळेकर, देवकर यांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यासाठी, कोणत्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे.  पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील सुहास धुमाळ यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.