होमपेज › Pune › मेट्रोचे सेगमेंट तयार; पण स्पॅन जुळवणी कासव गतीने

मेट्रोचे सेगमेंट तयार; पण स्पॅन जुळवणी कासव गतीने

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 12:32AMपिंपरी : मिलिंद कांबळे

महामेट्रोच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू असल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात सेगमेंट उभारणीचे काम खूपच मंद असल्याचे धक्कादायक चित्र आहे. कास्टिंग यार्डात मोठ्या संख्येने सेगमेंट तयार असूनही, गेल्या 6 महिन्यांत 80 ऐवजी केवळ 23 स्पॅन पूर्ण करण्यात आले आहेत. हा मंद वेग कायम राहिल्यास मार्गिकेस विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार आहे. मात्र, सध्या प्रत्यक्ष काम दापोडी ते चिंचवडपर्यंत सुरू आहे. या मार्गावर पिलर उभे राहत असल्याचे दृश्य दिसते. खराळवाडीपासून पिलरवर सेगमेंट बसविण्यास येत आहेत. हे काम अद्यावत चायनीज बनावटीच्या लॉचिंग मशिनद्वारे केले जात असले तरी, हे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. येथून मार्च महिन्यात सेगमेंट बसविण्यास सुरुवात झाली. दोन पिलरमध्ये 10 सेगमेंटची जुळणी झाल्यानंतर एका स्पॅनची जुळणी पूर्ण होते. सहा महिन्यांत म्हणजे ऑगस्टपर्यंत केवळ 21 स्पॅन पूर्ण करण्यात आले आहेत. हे काम खराळवाडी ते हॉपकिन इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारापर्यंत  610 मीटर अंतर इतकेच झाले आहे.  

तसेच, फुगेवाडी येथे भारतीय बनावटीच्या लॉचिंग मशिनची जोडणीचे काम सुरू आहे. तेथे क्रेनच्या सहायाने 3 पिलरमध्ये 2 स्पॅनची जुळणी पूर्ण केली गेली आहे. मशिन बसविल्यानंतर फुगेवाडीहून कुंदननगर, कासारवाडीच्या दिशेने सेगमेंट जोडले जाणार आहेत. आतापर्यंत 456 पैकी 188 फाउंडेशन व 146 पिलर तयार झाले आहेत. केवळ 68 पिलरवर ‘पिलर कॅप’ बसविले आहेत. ‘पिलर कॅप’चे काम पूर्ण झाल्याशिवाय सेगमेंट लावता येत नाहीत. हे काम संथ गतीने असल्याने नाशिक फाटा उड्डाणपुलाशेजारील ‘कास्टिंग यार्ड’मधील तयार सेगमेंट पडून आहेत. आतापर्यंत तब्बल 818 सेगमेंटची निर्मिती केली आहे. त्यातून किमान 81 स्पॅनची जुळणी केली जाऊ शकते. या मार्गावर एकूण 3 हजार 123 सेगमेंट लागणार आहेत. खराळवाडीतील 21 स्पॅनसाठी 210 आणि फुगेवाडी येथे 2 स्पॅनसाठी 20 असा एकूण 230 सेगमेंटचा वापर झाला आहे. त्यामुळे तब्बल 588 सेगमेंट यार्डातून तयार होऊन पडून आहेत. याच प्रकारे कामाचा मंद वेग राहिल्यास दापोडी ते मदर तेरेसा पुलापर्यंत सेगमेंटची जुळणीस विलंब होण्याची दाट शक्यता आहे.  

लवकरच 3 लॉचिंग मशिनद्वारे वेगात काम सुरू होईल 

फुगेवाडीत क्रेनद्वारे (जीएसएल) 2 स्पॅन पूर्ण करण्यात आले आहेत. त्यावर लॉचिंग मशिन बसविण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून मशिनद्वारे सेगमेंट जुळणीचे काम सुरू होईल. खराळवाडीतील मशिनद्वारे महिन्याला किमान 10 स्पॅन पूर्ण केले जातील; तसेच तिसरे लॉचिंग मशिन नाशिक फाटा येथे ऑक्टोबरमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यानंतर महिन्याला 15 स्पॅन पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत या मार्गावर स्पॅन पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोचे ‘रिच वन’चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी केला आहे.

एक किमीचे स्पॅन झाल्यानंतर सुरू होणार लोहमार्ग व इलेक्ट्रिक काम 

मेट्रोच्या पिलरवर किमान 1 किलोमीटर अंतर सेगमेंटची जुळणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर लोहमार्ग (ट्रॅक) व विद्युत जोडणीचे (ओव्हर हेड वायर) काम सुरू केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ 610 मीटर अंतराचा स्पॅन तयार आहे. मदर तेरेसा उड्डाणपूल ते रेंजहिल्स या मार्गावरील कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ‘पॅकेज वन’ची निविदा 65 कोटी आणि ‘पॅकेज टू’ ची निविदा 40 कोटी रुपयांची आहे. या कामाची मुदत दीड वर्षे आहे.