Thu, Jan 24, 2019 11:54होमपेज › Pune › खान्देशी महिला चालवितात क्रेन

खान्देशी महिला चालवितात क्रेन

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 10:44PMचाकण : वार्ताहर

पाणी आणि रोजगाराच्या शोधात कडाचीवाडी (ता. खेड) येथे खान्देशातून आलेल्या काही महिलांनी चक्क विहीर खोदायला घेतली आहे. आजवर केवळ पुरुषांचे म्हणून पाहिल्या जाणार्‍या या कामातील महिलांची ही भरारी पाहून येथील नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.यंदा कडकडीत उन्हाळ्याने पिके जळू लागली आहेत. जनावरांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी विंधनविहीर, विहिरी खोदण्याची कामे सुरू आहेत. या कामावरही दुष्काळग्रस्त भागातील नागरिक काम करताना दिसत आहेत. यात खोदाईचे काम पुरुष तर महिला त्यांना मदत करताना दिसतात.

कडाचीवाडी येथे खान्देशातील महिलांनीच एक विहीर खोदायला घेतली आहे. गावाचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांच्या शेतात सुरू असलेल्या या विहीर खोदाईच्या कामावर या महिला काम करीत आहेत. या विहीरीचे कामासाठी आलेले जळगावचे जाधव व झाकणे कुटुंबीय येथे तंबूमध्ये राहत आहेत. उदर्निवाहासाठी जळगावहून खेड तालुक्यामध्ये येऊन ही दोन्ही कुटुंबे हाताचा तोंडाशी मेळ घालण्यासाठी अत्यंत कष्टाचे काम करत आहे. यातील महिलासुद्धा क्रेन चालवताना व अवजड दगड भरताना दिसत आहेत. या कुटुंबाचे कष्ट व विहीरीचे काम पाहाण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. या महिलांची जिद्द व कष्ट पाहून परिसरातील भगिनीवर्गही अचंबित होत आहे.  आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी खान्देशी महिला कुठेही कमी नसल्याचे यावरून दिसून येते.