Thu, Aug 22, 2019 04:31होमपेज › Pune › प्‍लॅस्टिक पिशव्यांना गोबरकुंड्यांचा पर्याय 

प्‍लॅस्टिक पिशव्यांना गोबरकुंड्यांचा पर्याय 

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:51PMपिंपरी : प्रतिनिधी  

पुरातन भारतीय तंत्रज्ञानाचा अवलंब न करता आपण इतर गोष्टींच्या आहारी जातोय. प्लॅस्टिकचा भस्मासुर सध्या वाढतोय त्यामुळे पर्यावरणाची हानी होते आहे. याच प्लॅस्टिकला पर्याय आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षकल्याणी या गोबरकुंड्यांचे उत्पादन तळेगावातील केमिकल इंजिनिअर प्रसाद शिंदगीकर या तरुणाने केले आहे. देशी गाईच्या शेणाच्या कुंड्या बनवल्या तर ते उत्तम दर्जाचे खत आहे याच विचाराने हा पर्यावरणपूरक प्रकल्प सुरु केला आहे. 

तळेगावातील वराळे फाटा परिसरात हा प्रकल्प सुरु आहे. सध्या लहान स्तरावर सुरु असलेल्या या प्रकल्पामुळे चार कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. सामन्यत: रोपवाटीकांमध्ये रोपांकरिता प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुंड्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रोपवाटिका या दिसायला हिरव्यागार दिसतात मात्र, प्रत्येक रोपवाटीकेमागे रोपांसाठी वापरलेल्या प्‍लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढीग लागलेला असतो. खरतर हा वापर रोपांकरिता योग्य नाही. तसेच प्लॅस्टिकच्या कुंड्यांना या गोबरच्या कुंड्या हा उत्तम पर्याय आहे. याच विचाराने वृक्षकल्याणी या गोबरकुंड्यांचा विचार मनात आला. आणि जवळपास एक वर्ष कुंड्या तयार करण्यासाठी संशोधन केले, असे प्रसाद याने सांगितले. 

कोणताही छोटा मोठा व्यवसाय सुरु करण्यासाठी जागेची आवश्यकता असते. ही जागेची अडचण प्रसाद यांनाही होती. कैलास भोंगाडे यांनी डेअरी फार्मची जागा देऊ करुन हा प्रश्न सोडवला. त्यामुळे या कुंड्यांसाठी लागणारी पुरेशी जागा उपलब्ध झाली. नागरिकांना अगदी कमी खर्चात या कुंड्या उपलब्ध करणे हे प्रसाद यांचे ध्येय आहे. त्यानुसार अगदी 20 रुपयांत ही कुंडी उपलब्ध होते. यासाठीचे मशिन इंद्रजित आणि श्रीकांत पाटील यांनी बनवून दिले.

वृक्षकल्याणी बनवण्यासाठी शेण, गोमुत्र, निरगुडी आणि कडुनिंबाचा पाला, लाकडी भुसा वापरला जातो. या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या एकत्रित करुन या कुंड्या बनवल्या जातात.  या सगळ्या पर्यावरणपूरक गोष्टींचा अंतर्भाव असल्याने रोपांची वाढही उत्तम होते. बाजारात मिळणार्‍या कुंडीप्रमाणेच या कुंड्या दिसायला आकर्षक असतात. शेणाच्या कुंड्या असल्या तरिही त्या ठिसुळ नाहीत. त्यामुळे तुटण्याही भितीही कमी होते. या कुंड्याबरोबरच गोबर धुप, उदबत्या देखील तयार केल्या जातात. बाजारात मिळणार्‍या उदबत्यांपेक्षा कमी दरात या उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे.