Thu, Jun 27, 2019 01:31होमपेज › Pune › घरात घुसून चुलत्याची निर्घृण हत्या

घरात घुसून चुलत्याची निर्घृण हत्या

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

भिशीच्या पैशांवरूनसख्ख्या भावांनी चुलत चुलत्याचीच घरात घुसून फिल्मी स्टाईलने सत्तुराने वार करून निर्घृण हत्या केली. पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेली पत्नीही जखमी झाली आहे. कात्रजमधील अंजलीनगरमध्ये सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे. गोंधळानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी हल्‍ला करणार्‍यांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. 

चंदन गोबरीया मुडावत (वय 35, रा. अंजलीनगर, कात्रज, मूळ तेलंगणा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, लक्ष्मी मुडावत (वय 30) या घटनेत जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी रामूनायक किसननायक मुडावत (वय 28) आणि लालू ऊर्फ दशरथनायक किसननायक मुडावत (वय 30, रा. कात्रज-कोंढवा रोड, मूळ तेलंगणा) या हल्ला करणार्‍या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन हे गवंडी असून, नवीन बांधकाम साईटवर व घरांमध्ये फरशी बसविण्याची कामे करतात. चंदन हे आरोपींचे चुलत चुलते होते. ते पत्नीसोबत अंजलीनगरमधील गल्ली क्रमांक 3 मध्ये राहतात.  चंदन यांच्यावर तेलंगणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात ते सुटून बाहेर आले आहेत. चंदन आणि आरोपी यांनी भिशी लावली होती. त्यासाठी आरोपी हे चंदन यांना दिलेले पैसे मागत होते. मात्र, चंदन त्यांना दमदाटी करून पैसे देण्यास नकार देत असत. मूळ गावी असणारी दहशत यामुळे आरोपी त्यांना घाबरून असत. मात्र, सोमवारी रात्री चंदन, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि बहीण तिघे घरात जेवण करत होते. त्यावेळी दोघे त्यांच्याकडे पैसे मागण्यास म्हणून घरात घुसले.

त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. वादाला सुरुवात होताच आरोपींनी जवळच्या सत्तुराने त्यांच्या मानेवर, डोक्यात, पोटावर वार करून क्रूर हत्या केली.  पत्नी लक्ष्मी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याही यात जखमी झाल्या. त्यांनी मोठ-मोठ्याने आरडा ओरडा केल्याने शेजारी व परिसरातील नागरिक जमा झाले. काही क्षणातच मोठी गर्दी झाली. त्यावेळी दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, यातील लालू ऊर्फ दशरत नायक याला नागरिकांनी पकडले. तसेच, पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत रामू किसन हा पसार झाला. काही वेळाने तो स्वत: पोलिसांसमोर हजर झाला.