Tue, Nov 13, 2018 21:53



होमपेज › Pune › डिएसकेंकडे २४ मुद्यांची माहिती मागितली

डिएसकेंकडे २४ मुद्यांची माहिती मागितली

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 2:01AM



पुणे : प्रतिनिधी 

बांधकाम व्यावसायिक डी़  एस़  कुलकर्णी त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली 24 मुद्यांची माहिती देण्यास पोलिसांकडून सांगण्यात आले आहे़  ही माहिती आपण दोन दिवसात देऊ, असे आश्वासन डी़  एस़  कुलकर्णी यांनी पोलिसांना दिले. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत दररोज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले़  त्याप्रमाणे कुलकर्णी दाम्पत्य बुधवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहिले होते़  गुरुवारीही त्यांची दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली़  

ठेवीदारांची  फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर  पोलिस ठाण्यात 28 ऑक्टोंबर 2017  रोजी कुलकर्णी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़  या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाने त्यांना 50 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे़ 

परंतु, गेल्या महिन्याभरापासून ते पैसे भरण्यास कुलकर्णी यांना अपयश आले आल्याने त्यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यावेली पोलिसांकडून त्यांच्याकडे विविध मुद्द्यावर माहिती मागण्यात आली आहे़  बांधकाम व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवसाय करता़  सध्या करीत असलेल्या सर्व व्यवसायाची कागदपत्रे, भारतात कोणकोणते बांधकाम प्रोजेक्ट अपूर्ण अवस्थेत आहेत़  परदेशातील बांधकाम प्रकल्प, विविध व्यवसायामध्ये परिवारातील कोणकोणत्या व्यक्ती मदत करतात़  निधी कोठून मिळवला, तसेच इतर बँकांमधील खाती,  संचालकाचे सर्व पॅन क्रमांक, विवरण पत्रे, कुटुंबातील सर्व सदस्य व संचालकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची यादी, ग्रुपमधील सदस्य, संचालकांच्या ट्रस्टची कागदपत्रे, आयकर विवरण पत्रे, ज्या कंपनी, फर्ममध्ये भागीदार आहात, त्या कंपनीमधून आपण आपल्या वैयक्तिक खर्चासाठी किती रक्कम काढली़  त्याचा तपशील, तसेच आपल्या पत्नीने वैयक्तिक कारणासाठी कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतली, त्याची कागदपत्रे, ते पैसे  कोठे वापरले याची माहिती, त्यांच्या अथवा कुटुंबियांच्या नावे विमा कंपनीमध्ये किती रक्कमेची विमा, ठेव, गुंतवणूक केलेली आहे़  
तसेच म्युचअल फंड व शेअर्सच्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक असा सर्व तपशील देण्याची मागणी पोलिसांनी कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.