Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’ला न्यायालयाची मंजुरी

दापोडी-निगडी ‘बीआरटी’ला न्यायालयाची मंजुरी

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:08AMपिंपरी : प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी बीआरटीएस मार्गास मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये 25 किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व पालिकेचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी शुक्रवारी (दि. 10) सांगितले. हा देशातील पहिला दुहेरी बीआरटी मार्ग ठरणार आहे. 

या मार्गास केंद्राची 2006 ला मान्यता मिळाली होती. पालिकेने 2008 ला डीपीआर सादर केला. त्यास 2010 ला मंजुरी मिळाली. त्यानंतर 3 वर्षांनी 2013ला या कामास सुरुवात झाली. रस्ते काम सोडून आतापर्यंत या मार्गावर पालिकेने तब्बल 27 कोटी रुपये खर्च केला आहे. बस थांबे व लेन तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षा कारणांवरून अ‍ॅड. हिंमतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. 

पालिकेने मार्गावर आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकाच्या अहवालानुसार सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. तसेच, महापौर नितीन काळजे यांनी एकदा आणि तक्रारदारांसह 2 वेळा या मार्गाची ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. या संदर्भातील अहवाल पालिकेने न्यायालयात सादर केला. न्यायालयाने सदर मार्ग सुरू करण्यास गुरुवारी (दि. 9) मंजुरी दिली आहे. मार्गाचा दर महिन्यास आयआयटी पवईद्वारे पाहणी करून सुरक्षा अहवाल न्यायालयास सादर केला जाणार आहे, असे भोजने यांनी सांगितले. 

मार्गावरील सर्व थांबे तयार असून, केवळ पीएमपीएलकडून ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा (थांब्यावर बस आल्यानंतर दरवाज्याची उघड व झाप ही स्वयंचलित यंत्रणा) कार्यान्वित केल्यानंतर बससेवा सुरू होईल. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असा दावा त्यांनी केला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस थांबे, चौक, ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ येथे पीएमपीएलकडून सुरक्षारक्षक नेमला जाणार आहे. मेट्रोचे काम काही ठिकाणी सुरू असून, तेथे बस सर्व्हिस रस्त्यावरून धावणार आहे.  

36 बस थांबे, 276 बस

दापोडी ते निगडी या दुहेरी बीआरटी मार्गावर एकूण 36 बस थांबे आहेत. त्यावरून पीएमपीएलचे प्रती दिनी एकूण 276 बस धावणार असून, सुमारे 2 हजार 200 ते 2 हजार 300 फेर्‍या होणार आहेत. पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, अप्पर इंदिरा नगर, कात्रज, कोथरूड, कोथरूड डेपो, वाघोली, पुणे मनपा, वारजे माळवाडी या प्रमुख मार्गावरील बस धावणार आहेत. 

बीआरटी लेनमधून एसटीलाही बंदी

बीआरटी मार्गातून सध्या सर्व वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, बीआरटी सेवा सुरू झाल्यानंतर त्यातून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. केवळ रूग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहनांना प्रवेश मिळेल. एस.टी. बसगाड्यांनाही या मार्गातून प्रवेश दिला जाणार नाही, असे विजय भोजने यांनी स्पष्ट केले. 

या मार्गावर एकूण 7 चौक

या मार्गावर निगडीतील भक्‍ती-शक्ती, लोकमान्य टिळक, आकुर्डीतील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शिवाजी, चिंचवडमधील भगवान महावीर, मोरवाडीतील अहल्यादेवी पुतळा, पिंपरीतील डॉ. आंबेडकर हे 7 चौक आहेत. तर, नाशिक फाटा, दापोडी, फुगेवाडी रेल्वे पुल येथे ‘टी’ चौक आहेत. आकुर्डीतील बजाज ऑटो, काळभोरनगर,वल्लभनगर, कासारवाडी, कुंदननगर, फुगेवाडी हे 6 भुयारी (सबवे) मार्ग आहेत. सीएमई प्रवेशद्वारासमोर आणखी एक सबवे तयार होत आहे.