Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Pune › देश राजकारण्यांमुळे मोठा होत नाही 

देश राजकारण्यांमुळे मोठा होत नाही 

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:29PMपिंपरी : प्रतिनिधी

आरोग्य, शिक्षण, प्रशासन, सामाजिक संस्था, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांमुळे देश मोठा होतो, केवळ राजकारण्यांमुळे मोठा होत नाही. त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु खेळाडू, साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञांमुळे देश मोठा होतो. खेळाडू, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत होण्याचा सल्ला 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मध्य प्रदेश, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांचा जाहीर सत्कार डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शुक्रवारी (दि.23) नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे, तमिळनाडूचे ई गव्हर्नसचे आयुक्त तथा माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या विश्‍वस्त डॉ. स्मितादेवी जाधव, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ कार्यकारी सल्लागार सचिन इटकर, सुमनभाई शर्मा, रघुनाथ यमूल गुरुजी, सुमन भोंडवे, डॉ. हर्षदा भोंडवे, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी सायली शेळके, स्नेहल शेळके आणि स्वप्निल ढमढेरे या खेळाडूंचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. 

डॉ. देशमुख म्हणाले की, प्रशासनात तुमचा नागरिकांशी संपर्क येतो. काम करताना माणसाच्या अर्जाबरोबरच माणूस वाचता आला पाहिजे. सामाजिक भान ठेवून समाजातील प्रश्‍न समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी तुमचे सामाजिक भान महत्त्वाचे आहे. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, नवीन पिढीला बेरोजगारीचा मोठा  प्रश्‍न सतावत आहे. त्यातून या तरुण पिढीला पुढे जायचे आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे. सध्याचे तरुण आयएएस अधिकारी मनाने अत्यंत सरळ आहेत. येणार्‍या माणसांचे प्रश्‍न ऐकून घेऊन ते प्रश्‍न सोडवतात. 

हा मोठा अभिमानाचा भाग आहे. तो अनुभव मी संकेत भोंडवे यांच्या कार्यालयात गेलो त्या वेळी घेतला. यशस्वी लोकांकडून तुम्ही मार्गदर्शन घेणे आवश्यक असून, त्यासाठी जिद्द आणि चिकाटी हवी. मला किती मार्क पडतात, यापेक्षा तुम्हाला काय व्हायचे आहे, हे ठरवले पाहिजे. उपप्राचार्य रणजित पाटील यांनी केले, तर प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि नीता मोहिते यांनी आभार मानले.

यूपीएससी माझी प्रेयसी होती...

मी दहावीला असल्यापासूनच अनेक परीक्षा नापास होत होतो; परंतु ध्येय ठरवले होते. आपल्याला आयएएस व्हायचे हे मनाशी पक्के ठरवून स्वतः पुण्यातच राहून अभ्यास केला. सर्व सोडून केवळ यूपीएससीलाच प्रेयसी मानून दिवसातील अनेक तास अभ्यास केला.