Tue, Apr 23, 2019 23:44होमपेज › Pune › पीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक

पीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:14AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जी महिला कौटुंबिक हिंसाचाराने  पीडित आहे, तिच्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला हवे, मात्र ते दिले जात नाही. न्यायप्रक्रियेत तिच्या मनावर फुंकर घालण्याबरोबरच तिला न्याय मिळवून देण्यासाठी समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा समुपदेशकांची गुणवत्ता वाढली पाहिजे,” असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. 

आयएलएस विधी महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्राने कौटुंबिक हिंसा, मानसिक आरोग्य आणि समुपदेशन’ प्रकल्प राबविला होता. यातील अभ्यासानुसार समुपदेशकांना उपयुक्त अशी ‘प्रवास सक्षमतेकडे’ ही मार्गदर्शिका तयार केली असून, तिचे प्रकाशन रहाटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्या बाळ, प्राचार्या वैजयंती जोशी, डॉ. जया सागडे आदी उपस्थित होते. 

शिक्षण, आर्थिक स्थिती, मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न या कारणांमुळे महिला अत्याचार सहन करतात, असे नमूद करत रहाटकर म्हणाल्या, तिला अशावेळी काय करावे, ते कळत नाही. तिला सल्ला हवा असतो. अनेकदा भांडण, वाद तिचे नातं तुटण्यापर्यंत वाढतात. या वेळी त्या दांपत्याचे समुपदेशन केले जाते. मग शेवटच्या क्षणी न्याय हवा की नातं या संभ्रमात ती महिला अडकते. अशावेळी समुपदेशकांची स्थिती अडचणीची होते. परंतु समुपदेशकांना संबंधित महिलेची मानसिकता ओळखता आली पाहिजे. त्याप्रकारे समुपदेशकांचे काम व्हायला हवे.

महिला आयोगाकडे दाखल होणार्‍या प्रकरणांपैकी 60 ते 70 टक्के प्रकरणे ही कौटुंबिक हिंसाचारासंबंधीची असतात. एकीकडे महिला तक्रार करण्यास पुढे येत आहे, ही जमेची बाजू असली, तरी हिंसाचाराचे प्रमाण वाढणे हे धोकादायक आहे. महिला आयोग, विविध समुपदेशन केंद्र, महिला व बाल कल्याण विभाग आणि पोलिस यंत्रणेकडे महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी येतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील सर्वोत्तम कुटुंब व्यवस्था आपण मानतो. पण, ती ढासळते आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे,” असेही रहाटकर म्हणाल्या.