Tue, Mar 19, 2019 09:30होमपेज › Pune › भारतात प्रथमच पेन इंटरनॅशनलची परिषद

भारतात प्रथमच पेन इंटरनॅशनलची परिषद

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

पेन इंटरनॅशनलतर्फे प्रथमच भारतात सप्टेंबर महिन्यात पेन इंटरनॅशनल परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये जगभरातील लेखक, कवी यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय संविधानात दिलेला अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा अधिकार, महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि भारतातील विविधतेतील एकता यामुळे प्रेरित होऊन या परिषदेचे आयोजन भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘पेन इंटरनॅशनल’ या संस्थेचे अध्यक्ष कार्ल्स टॉरनेर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी शैला दाभोलकर, उमा पानसरे, साहित्यिक गणेश देवी, अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख उपस्थित होते. पेन इंटरनॅशनल ही जगातील लेखक आणि कवींचे प्रतिनिधित्व करणारी सर्वांत जुनी संघटना आहे. या संस्थेला 97 वर्षे पूर्ण झाले आहेत. 

सदर संघटनेचे काम 100 पेक्षा जास्त देशांत विस्तारलेले असून, 14 हजार तिचे सदस्य आहेत. संघटनेचे मुख्यालय लंडन येथे असून, संघटनेच्या पन्नासपेक्षा अधिक सदस्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. भारतातील रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद हे पेन इंटरनॅशनलचे सदस्य होते.

नागरिकांनी दबाव निर्माण करावा

डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, त्या ठिकाणावरून पाच मिनिटावर पोलिस ठाणे होते. मात्र, पोलिस आरोपींना अटक करू शकले नाहीत. पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतर देखील मारेकरी सापडले नाहीत, ही शोकांतिका आहे. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे महत्त्व संविधानाने प्रदान केले आहे. त्यामुळे, कोणत्याही नागरिकाचा आवाज, विचार दाबले जाऊ शकत नाही. खुनाचे गुन्ह्यातील मारेकरी, सूत्रधार मिळावे याकरिता नागरिकांनीच सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.    - शैला दाभोलकर

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे प्रकरणात न्याय मिळावा

अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य हे लेखक, कलाकार, पत्रकार यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अभिव्यक्‍ती हक्‍कासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. जगभरात लेखक, पत्रकार यांच्यावरील हल्ल्यांची 900 प्रकरणे प्रलंबित आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, साहित्यिक एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या वैचारिक पार्श्‍वभूमीतून झालेल्या आहेत. या खून प्रकरणात विचारवंतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे.      - कार्ल्स टॉरनेर, अध्यक्ष, पेन इंटरनॅशनल