पुणे : प्रतिनिधी
कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या एसआयटीने आणखी दोघांना विरार आणि भिवंडी येथून अटक केली. यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.
नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अर्पामेंट, नारंगी रस्ता, विरार. मुळ रा. कुलीना टुकुरा, जि. बरगर, ओरिसा) आणि मोहम्मद सईद ईक्बाल हूसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, धावरीतांडा, नांदेड), फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) या चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब्बार आणि राठोड यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे.
बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने विविध भागातील सर्वजण कोल्हापूर येथे आले होते. त्यांनी क्लोन केलेल्या एकूण ९५ एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले. भारतातील विविध एटीएम केंद्रांतून अडीच कोटी रुपयांची रोकड काढण्यात आली होती. ४१३ बनावट डेबिट कार्डचा वापर करून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही वरून त्यांची छायाचित्रे मिळाली होती. मोबाईलची माहिती आणि फोटो यावरून पैसे काढणारे भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.