Fri, May 24, 2019 08:28होमपेज › Pune › कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याचे कोल्हापूर कनेक्शन

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याचे कोल्हापूर कनेक्शन

Published On: Aug 16 2018 4:00PM | Last Updated: Aug 16 2018 4:52PMपुणे : प्रतिनिधी

पुणे-कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हर वर झालेल्या सायबर हल्ला करत रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम लांबविल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. यामध्ये  पोलीस अधिकार्‍यांसह सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे. तर, या प्रकरणात कोल्हापूरातून काही पैसे काढण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर कोल्हापूर कनेक्शनचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे पथक कोल्हापुरात रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करत अनेक खातेदारांच्या रुपे कार्डची डाटा चोरून  खात्यातून कोट्यवधी रूपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर चतु:श्रृंगी  पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास  सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली  सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, सहा पोलीस कर्मचारी तसेच सायबर गुन्हे विषयक तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बँक अधिकार्‍यांकडून काही तांत्रिक माहिती मागविली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर कनेक्शन शोधासाठी पथक रवाना 

सायबर हल्ला करणाऱ्या चोरट्याने बँकेच्या खात्यातील रक्कम हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेचे खाते तसेच देशातील आणि परदेशातील काही खात्यातून काही रक्कम काढली.  त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाºयांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. कोल्हापुरातून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याची  माहिती सूत्रांनी दिली.