Fri, Jul 19, 2019 18:36होमपेज › Pune › शहरात नगरसेवकांचे ढीगभर नामफलक

शहरात नगरसेवकांचे ढीगभर नामफलक

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:23PM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात आलेले नगरसेवकांचे नामफलक वेगवेगळ्या रंग आणि आकाराचे आहेत. माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांचेही शहरात ढीगभर नामफलक आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, याबाबत स्थायी समितीने नाराजी व्यक्त केली. धोरण ठरवून त्या पद्धतीने सर्व नगरसेवकांचे नामफलक लावण्याच्या सूचना समितीने प्रशासनाला दिल्या; तसेच माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांचे फलक काढून टाकण्यास सांगितले. 

समितीची सभा गुरुवारी (दि. 7) सीमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिकेचे एकूण 128 आणि स्वीकृत 5 असे एकूण 133 नगरसेवक आहेत. शहरात नगरसेवकांचे 4 ते 5 वेगवेगळे नामफलक लावले गेले आहेत. नगरसेवकांच्या कार्यालयाकडे, निवासस्थानांकडे आणि संपर्क कार्यालयांकडे असे फलक प्रभागात चौकाचौकात लावले गेले आहेत. सदर फलकाचे रंग आणि टाईपही वेगवेगळा आहे; तसेच त्याचा आकार आणि उंचीही भिन्न आहे. त्यामुळे महापालिकेच्या कररूपी पैशाची उधळपट्टी होत आहे. नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांच्या नामफलकांमध्ये एकसूत्रता नसल्याने शहर विद्रूप होत आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांचे प्रभागातील नामफलक एकसारखे असावेत, अशी सूचना त्यांनी केली. एका नगरसेवकाचे प्रभागात 4 ते 5 नामफलक आहेत, ही बाब योग्य नाही. त्यावर भाजपच्या मोनिका कुलकर्णी यांनी सध्या लावलेले नामफलक न काढण्याची मागणी केली. भाजप नगरसेवकांचे नामफलक पक्षाच्या ध्वजाप्रमाणे हिरव्या व केशरी रंगांत आहेत. 

यावर समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे यांनी प्रशासनाला नगरसेवकांचे नामफलक एकसारखे लावण्याच्या सूचना केल्या. नामफलकाचे रंग, टाईप, आकार आणि उंची एकसारखी ठेवावी. प्रभागात एकच नामफलक लावावा. माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांचे नामफलक काढून टाका. यासंदर्भात धोरण ठरवून ते समितीपुढे सादर करण्यास सांगण्यात आले. 

नगरसेवकांच्या नामफलकांत भेदभाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी आले आहेत. भाजप कारभार्‍यांनी आपल्या नगरसेवकांचे नामफलक हिरव्या व केशरी रंगांत लावले आहेत; तसेच स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सदस्यांची नावेही त्याच पद्धतीने हिरव्या व केशरी रंगांत लावली गेली आहेत; मात्र राष्ट्रवादी काँगेस व शिवसेनेच्या नगरसेवकांचे फलक पूर्वीप्रमाणे हिरव्या व पांढर्‍या आणि निळ्या व पांढर्‍या रंगांत आहेत. पक्षानुसार नगरसेवकांचे वेगगेवळे नामफलक महापालिका प्रशासन तयार करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाबाबत इतकाच अभिमान असेल, तर भाजप नगरसेवकांनी स्वत:च्या खर्चाने हिरव्या व केशरी रंगांचे नामफलक लावावेत, असा सल्ला विरोधकांनी दिला आहे.