Fri, Jul 19, 2019 19:48होमपेज › Pune › नगरसेवक कामठेंवर अदखलपात्र गुन्हा

नगरसेवक कामठेंवर अदखलपात्र गुन्हा

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:45PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि.16) विनापरवाना लावलेले जाहिरात फ्लेक्स टाकून, प्रशासनाचे लक्ष वेधणार्‍या भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.17) अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पिंपळे निलख प्रभागातील विनापरवाना जाहिरात फ्लेक्सवर कारवाईची वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नगरसेवक कामठे यांनी आंदोलन करीत परवा सत्ताधार्‍यांना घरचा आहेर दिला होता. याप्रकरणी महापालिकेच्या सुरक्षारक्षकाने तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर कामठे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, यापूर्वी प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ मनसेचे गटनेते सचिन चिखले व त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पौर्णिमा सोनावणे, त्यांचे पती व कार्यकर्त्यांनी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर ‘कचरा फेको’ आंदोलन केले होते. त्या वेळी मात्र त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा महापालिका प्रशासनाने दाखल केला होता. आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासन सत्ताधारी नगरसेवकांना अभय देत असल्याची टीका महापालिका वर्तुळात जोर धरू  लागली आहे.