Fri, Aug 23, 2019 22:05होमपेज › Pune › कॉर्पोरेट क्षेत्रालाही कृषी पर्यटनाची भुरळ

कॉर्पोरेट क्षेत्रालाही कृषी पर्यटनाची भुरळ

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

अलिशान इमारती, चकचकीत कक्ष, कडक युनिफॅार्म, शिस्तबद्ध वातावरण अशी ओळख असलेल्या ‘कॅार्पोरेट जगता’ला ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाची चांगलीच भुरळ पडल्याचे दिसते.  गेल्या वर्षभरात याच क्षेत्राने कृषी पर्यटनाला सर्वाधिक महसूल मिळवून दिला असून दीड लाखांहून अधिक कॅार्पोरेट पर्यटकांनी या पर्यटनाचा आनंद लुटला.

राज्यात कार्यरत असलेल्या 518 कृषी पर्यटन केंद्रांना आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 7 लाख 68 हजार 815 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यातून शेतीमाल विक्री आणि महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसही मदत झालेली असून शेतीला पूरक असलेल्या या केंद्रांमध्ये तब्बल 20 कोटी 33 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले. एकट्या कॅार्पोरेट क्षेत्राने सुमारे साडेसहा कोटींचा महसूल मिळवून दिला. 1 लाख 59 हजार पर्यटकांनी भेटी दिल्या.

16 मे हा दिवस जागतिेक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कार्यरत असलेल्या बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. कृषी पर्यटन विकास संस्थेचे कार्यकारी संचालक पांडुरंग तावरे यांनी याबाबत माहिती दिली. कृषी पर्यटन केंद्राकडे शेतकरी आणि व्यावसायिकांचीही ओढा वाढल्याने या पर्यटनाला चांगला वाव आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 110 केंद्रे कार्यरत आहेत. त्या खालोखाल प्रामुख्याने सातारा 77, सांगली 5, कोल्हापूर 5, अकोला 1, लातूर 2, नांदेड 1, ठाणे 13, औरंगाबाद 5, नागपूर 9, वाशिम 1, नाशिक 6, पालघर 3, धुळे 3, सोलापूर 7, अमरावती 3   आदींचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातही कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.