Wed, Apr 01, 2020 09:39होमपेज › Pune › अडीच तासांत कोरोनाचा चाचणी अहवाल

अडीच तासांत कोरोनाचा चाचणी अहवाल

Last Updated: Mar 25 2020 11:34PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या अडीच तासांत आता कोरोना झाला आहे की नाही याचा चाचणी अहवाल मिळू शकणार आहे. पुण्यानजीकच्या माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन या लॅबने कोरोना चाचणी करण्यासाठी एक नवीन किफायती ‘टेस्टिंग किट’ विकसित केले आहे. ‘पॅथो डिटेक्ट कोव्हिड-19’ असे या किटला नाव दिले आहे. संपूर्णतः देशी बनावटीचे किट असून भारतात असे किट बनवणारी ही पहिलीच लॅब आहे. सध्या या चाचणीसाठी 4 ते 8 तासांचा कालावधी लागतो.

माय लॅब मॉलिक्युलर डायग्नोस्टिक क्षेत्रातील प्रयोगशाळा असून त्यांच्या या नवीन विकसित केलेल्या किटला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल (सीडीएससीओ) कडून उत्पादन करण्यास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. एका दिवसाला अशी 15 हजार किट तयार केली जाऊ शकतात आणि आवश्यकता पडल्यास ही उत्पादनक्षमता 25 हजारांपर्यंत वाढविली जाऊ शकते.  तसेच या किटचा खर्च आता सध्याच्या खर्चाच्या एकचतुर्थांश (अंदाजे 1 हजार रुपये) असणार आहे. 

गेल्या आठवड्यात पुण्यातील एनआयव्हीने केंद्र सरकारकडे दहा लाख टेस्टिंग किटची मागणी केली होती. आपल्याला आतापर्यंत या किट मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता आपण याबाबत स्वयंपूर्ण झालो आहोत. लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ  
म्हणाले की, कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का, हे निश्‍चित करण्यासाठी सध्याच्या उपकरणाच्या मदतीने 6 ते 8 तास लागतात. तर एनआयव्हीला 4 तास लागतात.

मात्र, आम्ही विकसित केलेल्या उपकरणामुळे हे काम अडीच तासांत होईल. 25  शास्त्रज्ञांनी आठ दिवसांत हे किट तयार केले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्लूएचओ) नियमाप्रमाणे विविध पातळ्यावर तपासण्या करून हे किट बनविण्यात आले आहे.नांगरगाव औद्योगिक वसाहतीतील माय लॅब च्या प्रकल्पात मागील सात ते आठ वर्षापासून विविध चाचण्यांची किट बनविण्यात येत असल्याने कोरोना टेस्टिंग किट बनविण्यास आठ ते दहा दिवस लागले.