पुणे : पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Last Updated: Jun 02 2020 2:52PM
Responsive image


सासवड : पुढारी वृत्तसेवा 

पुरंदर तालुक्यातील मांढर येथील ७५ वर्षीय एका  ज्येष्ठ नागरिकाचा सोमवारी (दि.१) पहाटे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर ज्येष्ठ नागरिकात कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मंगळवारी ( दि. २) अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. यामुळे पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मांढर मधील सदर व्यक्तीला सासवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू त्या व्यक्तीस सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या स्वॅब चाचणीसाठी पुण्यात पाठवण्यात आला होता. अहवाल येण्यापूर्वीच सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत व्यक्तीचा अहवाल मंगळवारी (दि. २)  प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोनाव्यतिरिक्त या व्यक्तीला दमा आणि उच्च रक्तदाबाचाही आजार होता, त्यात निमोनियाचीही लक्षणे दिसत होती. त्यामुळे मयत व्यक्तीचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. किरण राऊत यांनी सांगितले. हा अहवाल मंगळवारी मिळाला असून यामध्ये मांढरमधील सदर ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्या ज्येष्ठ नागरीकाचा अंत्यविधी मांढर येथे आवश्यक खबरदारी घेऊन केल्याचे तहसीलदार सरनोबत यांनी सांगितले. 

बाधित व्यक्ती दाखल असलेल्या सासवड मधील खासगी रुग्णालयातील ८ तर ग्रामीण रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुरंदरमधील कोरोना बाधितांची संख्या ५ झाली आहे.