होमपेज › Pune › शनिवारवाडा दत्तक देण्यास विरोध 

शनिवारवाडा दत्तक देण्यास विरोध 

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहराचे वैभव असलेला शनिवारवाडा खासगी कंपनीला दत्तक देण्यास पुणेकर नागरिक, सामाजिक संघटनांसह विरोधी पक्षांनीही तीव्र विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारच्या ‘अडॉप्ट अ हेरिटेज’ म्हणजेच पुरातन वास्तू दत्तक योजनेतून लाल किल्ल्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील 12 ठिकाणांसाठी स्वारस्य प्रस्ताव मागविण्याची योजना केंद्र सरकारच्या रडारवर आहे. यात पुढल्या टप्प्यात ‘शनिवारवाडाही दत्तक देणे आहे,’ असे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने 3 मे रोजी प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

देशाची सांस्कृतिक ओळख असलेल्या देशातील विविध पुरातन वास्तू एखाद्या स्वयंसेवी संस्थेला किंवा खासगी कंपनीला दत्तक देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. देशाच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करण्याची ताकद सरकारमध्ये राहिली नाही, त्यामुळे या वास्तू दत्तक देण्याचा निर्णय घेतला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. नवीन संस्थानिक निर्माण करणार्‍या या योजनेस आमचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. 

खासगी कंपन्या किंवा स्वयंसेवी संस्थांना ऐतिहासिक वास्तू दत्तक देणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. शनिवारवाड्याच्या संदर्भात पालिकेतील सत्ताधार्‍यांनी ठोस धोरण आखावे.  - चेतन तुपे, महापालिका विरोधी पक्षनेते 

गड, किल्ले, पुरातन वास्तू संस्थानिकांच्या ताब्यातून देशाच्या ताब्यात आल्या आहेत. त्या पुन्हा दत्तक देऊन, नव्याने संस्थानिक निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. शनिवारवाडा दत्तक देण्यास मनसेचा विरोधच राहील.  - अजय शिंदे, मनसे शहराध्यक्ष 

शनिवारवाडा दत्तक देण्यासंदर्भात केंद्राकडून कोणत्याही प्रकारचे पत्र महापालिकेला आलेले नाही. ते पत्र आल्यास त्यातील तरतुदी, अटी आणि त्याचा खर्च पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल.  - मुक्‍ता टिळक, महापौर 

पुरातन वास्तू दत्तक दिल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्ती होत असेल, तर दत्तक देण्यास काही हरकत नाही; मात्र शनिवारवाड्यासंदर्भात पत्र मिळाल्यानंतरच सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.  - श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते