Wed, Mar 20, 2019 02:33



होमपेज › Pune › सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा ‘डल्‍ला’

सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा ‘डल्‍ला’

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AM



पिंपरी : प्रदीप लोखंडे

कचरावेचक, सफाई कर्मचारी, वाहनचालक व इतर सर्वांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेतले जाते. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून किमान वेतनानुसार पगार दिला जात नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. अनेक कामगारांचे एटीएम ठेकेदारांकडेच आहेत. त्यामुळे सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदार डल्‍ला मारत असून, कामगारांची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे ठेकेदारांवर कारवाई कोण करणार, असा सवाल कामगार संघर्ष संघटनेने उपस्थित केला आहे. 

शहरात सुमारे 375 महिला कचरावेचक, 170 ड्रायव्हर व 2 हजार सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. या कंत्राटी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये वेतनाचा प्रश्‍न, आरोग्याच्या सुविधा, पीएफची रक्‍कम व कायमस्वरूपी काम मिळणेबाबत समस्यांचा यामध्ये समावेश होतो. सफाई कर्मचार्‍यांना पूर्ण पगार देण्याऐवजी अर्धाच पगार दिला जात आहे. 

कामाचे तास अधिक होऊनही कमी पगार दिला जात आहे. महापालिकेने पालिकेसाठी सेवा देणार्‍या कामगारांना व सफाई कामगारांन किमान वेतन दर लागू करण्यात बाबत मान्यता दिली आहे. त्यानूसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांमार्फत क्षेत्रीय कार्यालयासाठी नियुक्‍त केलेल्या ठेकेदारांना किमान वेतन निश्‍चित केले आहे. या सफाई कामगारांना मुळ वेतन 10 हजार रुपये, विशेष भत्‍ता 1 हजार रुपये ठरवून दिला आहे. असे मुळ वेतन सुमारे 11 हजार 394 रुपये ठरवून देण्यात आले आहे. मात्र शहरातील आरोग्य विभागाचे ठेकेदार सफाई कर्मचार्‍यांना मुळ वेतन देत नाही.

या बरोबरच अनेक जण पीएफची रक्‍कम देखील भरत नाहीत. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांना न्याय देणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे; त्वरीत या बाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार संघर्ष संघटनेचे सनी पवार, बाबु सांगोळकर, अतुल क्षीरसागर यांनी दिला.