Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Pune › कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

Published On: Jul 13 2018 1:14AM | Last Updated: Jul 13 2018 1:09AMपिंपरी :  महामार्गावरून डांगे चौकाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला कंटेनरने चिरडले. हा अपघात गुरुवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास मुंबई बंगळूर महामार्गावरील भुमकर चौकात झाला. रमेश विलास सोंडे (35,रा. निगडी प्राधिकरण) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश सोंडे महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने येत असताना कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे रमेश सोंडे जमिनीवर कोसळले. कंटेनरचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कंटेनरचालक स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

कार चालकाला लुटले

पिंपरी :  रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या कार चालकाला लुटून महत्वाची कागदपत्रे आणि कार पळवून नेली. ही घटना मुंबई बंगळूर महामार्गावर बावधन येथे गुरुवारी (दि. 12) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.संतोष कुमार शिंदे (24, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंदे यांची कार (एमएच 14-जीडी-5984) हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीला भाडेतत्वावर दिली आहे. त्या कारवर शिंदे स्वतः चालक म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे शिंदे कंपनीतील कर्मचार्‍यांना आणण्यासाठी जात असताना बावधन येथे लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी अज्ञात दोघेजण कारमधून त्यांच्याजवळ आले. दोघांनी मिळून शिंदे यांना दमदाटी करून त्यांच्याजवळ असलेले बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे आणि कार असा एकूण 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. 

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी :   तीन लाखांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती सुशील रामटेके (32,रा. शक्तीनगर, दुर्गापूर) या विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती सुशील रामटेके, सासरा रमेश रामटेके, दीर निखिल रामटेके (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातीकडे तीन लाख रुपयांसाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. तिला घरातून बाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. 

विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई 

तळेगाव दाभाडे :  तळेगाव दाभाडे पोलीस हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरूणावर कारवाई करण्यात आली.  या प्रकरणी धनंजय बाळासाहेब टकले (18, रा. टकलेवस्ती तळेगाव दाभाडे) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत नभांगण सोसायटीसमोर टकले वस्ती येथे एक तरूण विनापरवाना घातक शस्त्र जवळ बाळगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे यांच्या पथकाने गुुरूवारी सायंकाळी चार वाजता सापळा रचून टकले यास ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्याकडे दोन तलवारी, दोन कोयते व एक गुप्ती अशी घातक शस्त्रे मिळाली. पोलिसांनी टकले यास ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली आहे.