Sat, Mar 23, 2019 02:29होमपेज › Pune › बांधकाम परवानगी विभागास ३९९ कोटींचे उत्पन्न

बांधकाम परवानगी विभागास ३९९ कोटींचे उत्पन्न

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून बुधवार (दि.21)अखेरपर्यंत तब्बल 399 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अर्थसंकल्पात बांधकाम विभागाला 340 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. ते सव्वा महिना शिल्लक असतानाच पूर्णात्वास केले गेले आहे. ‘महारेरा’ कायद्यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पासाठी बांधकाम परवानगी घेतल्याने पालिकेच्या यंदाचा उत्पन्नात भर पडली आहे. 

शहरातील विविध भागांमध्ये अनेक नवे बांधकाम प्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक म्हणून सदनिका खरेदी केल्या जातात. वाकड परिसरात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक 901 गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

त्या खालोखाल रहाटणी, काळेवाडी परिसरात 416 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. आकुर्डी परिसरात सर्वांत कमी संख्येने बांधकामांना परवानगी घेण्यात आली आहे. ती संख्या केवळ 15 इतकी आहे. 

शहराच्या विविध भागात गेल्या 7 वर्षांत बांधकामांना दिलेल्या परवानगींची संख्या पुढीलप्रमाणे आहे ः 2011 मध्ये 772, 2012 मध्ये 913, 2013 मध्ये 1 हजार 157, 2014 मध्ये 1 हजार 294, 2015 साली 1 हजार 140, 2016 मध्ये 1 हजार 523 आणि 2017 मध्ये 1 हजार 790 अशा एकूण 8 हजार 889 बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जास्त परवानगी 2017 मध्ये देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने ‘महारेरा’ कायदा सुरू केल्याने बांधकाम व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांची नोंदणी करीत आहेत.

रेरा नोंदणी असलेल्या प्रकल्पांमध्येच नागरिक व व्यापारी रक्कम गुंतवत असल्याने बांधकाम नोंदणीची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. येत्या 2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाला 400 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या विभागाचे प्रमुख अय्युब खान पठाण यांच्या कार्यपद्धतीमुळे ही भर पडल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. नुकताच हा विभाग सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

नऊ वर्षांतील सर्वांधिक महसूल

बांधकाम परवानगी विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षात 370 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. बांधकाम विभागाने ते पूर्ण केले असून, बुधवारअखेर 399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला 2009-10 या आर्थिक वर्षात 107 कोटी 32 लाख, 2010-11 मध्ये 126 कोटी 48 लाख, 2011-12 मध्ये 190 कोटी 24 लाख, 2012-13 मध्ये 261 कोटी 15 लाख, 2013-14 मध्ये 334 कोटी 33 लाख, 2014-15 मध्ये 239 कोटी 3 लाख, 2015-16 मध्ये 364 कोटी 19 लाख आणि 2016-17 मध्ये 351 कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. 2017-18 मध्ये 21 फेबु्रवारीपर्यंत 399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.