Sun, May 26, 2019 13:22होमपेज › Pune › नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ मार्चमध्ये

नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ मार्चमध्ये

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील महत्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्पाच्या कामांचा प्रारंभ केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने लांबणीवर पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. 

शहराच्या मध्यातून वाहणार्‍या मुठा आणि मुळा नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत नदीत सोडण्यात येणार्‍या  मैलामिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या आदेशानुसार पालिकेने आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या खर्चासाठी जपानच्या जायका या कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून पालिकेला आर्थीक सहकार्य केले आहे.  जायका कंपनीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून होणार्‍या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात साधारण पाच मैला पाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या  400 कोटींच्या निविदा मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात काढण्यात येणार आहेत. 

या प्रकल्पाचे काम मोठे असून यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय एक वर्षापूर्वी घेण्यात आला होता. त्याला नुकतेच मुहुर्त लागला असून  इंग्लडच्या एका कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी सल्लागार नेमल्यानंतर पालिकेने प्रकल्पाचे काम करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मैला पाणी प्रकिया केंद्रासाठीच्या सहा जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. या जागांवर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागविण्यात येणार आहेत. यासाठी एस्टीमेटचे काम लवकरच होणार असून मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत टेंडर्स काढण्यात येणार आहे.

प्रकल्पांतर्गत शहरात गोळा होणार्‍या मैला मिश्रीत पाण्यावर नदी काठी प्रक्रिया प्रकल्प उभारून पाण्यावर प्रक्रीया केल्यानंतर ते पाणी नदीत सोडले जाणार आहे. पालिकेने यापूर्वी नदी काठावर असे प्रक्रिया प्रकल्प उभारले असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर आणखी 11 प्रक्रिया प्रकल्प तसेच ट्रंक लाईनची कामे करण्यात येणार आहेत.