होमपेज › Pune › नवीन इमारतीचे बांधकाम सुरक्षित

नवीन इमारतीचे बांधकाम सुरक्षित

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

.उद्घाटन समारंभातच उपराष्ट्रपतींसमोरच पावसाच्या पाण्याने गळती झालेल्या नवीन विस्तारीत इमारतीच्या सभागृहाचा डोम व इमारतीचे बांधकाम सुरक्षित असल्याचा अहवाल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने (सीओईपी) दिला आहे. त्यामुळे नवीन इमारतीच्या पाणी गळतीमुळे अडचणीत आलेल्या महापालिका प्रशासनाला किंचित दिलासा मिळाला आहे. 

महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन 21 जून रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, हा समारंभ सुरू असतानाच सभागृहात पावसाच्या पाण्याची गळती झाली. त्यामुळे पालिका प्रशासनाची आणि सत्ताधारी भाजपची नाचक्‍की झाली होती. त्यानंतर पालिकेच्या मुख्यसभेत गळती प्रकरणाचे पडसाद उमटले. या सगळ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या इमारतीचे सीईओपीकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय आयुक्‍त सौरभ राव यांनी घेतला होता. त्यानुसार सीओईपीने हे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले असून, त्याचा अहवाल आला आहे. 

या अहवालात या इमारतीमध्ये सार्वजनिक वापरासाठी असलेले बांधकामांचे निकष पाळण्यात आले असल्याचे, तसेच गळती झालेल्या डोमची रचना; तसेच बांधकाम वापरासाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष बांधकाम आणि नकाशांमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आले असल्याचेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात आता आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा तसेच इतर सूचनांसह अंतिम अहवाल सीओईपीकडून पुढील दहा दिवसांत महापालिकेस देेणार असल्याचे नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.