Tue, Jan 22, 2019 12:13होमपेज › Pune › बांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही

बांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी 

घनकचरा व्यवस्थापनाविषयी ठोस धोरण आखले जात नाही तोपर्यंत सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या बांधकामांना बंदी घातली आहे. या आदेशामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्य सरकार आपली भूमिका मांडून ठोस धोरण जाहीर करत नाही तोपर्यंततरी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून मेट्रोचे बांधकाम सुरू राहणार आहे. 

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार अद्यापही अनेक राज्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र राज्यात बांधकाम बंदी केली आहे. या बांधकाम बंदीचा फटका शहरातील प्रमुख सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांना बसणार का, असा प्रश्‍न सध्या समोर येत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या घनकचर्‍याचा मोठा घातक परिणाम होत असल्याचे दिसून आले असल्याने सुप्रिम कोर्टाने बांधकामांच्या परिस्थितीवर ताशेरे ओढत बंदी घातली आहे. 

मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरूच   

सुप्रिम कोर्टाने दिलेला आदेश हा प्रामुख्याने घर बांधकामांविषयी असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या तरी मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू राहणार असून, राज्य शासनाकडून घनकचरा व्यस्थापनाविषयी निर्णय जाहीर केल्यानंतर महामेट्रोकडूनही घनकचरा व्यवस्थापनाविषयी पुढील योजना ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.