Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Pune › पिंपरी डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन बांधावे

पिंपरी डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन बांधावे

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मचा वापर होत नसल्याने या फार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पिंपरी- चिंचवड शहरासाठी या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात आणि चाकणच्या एमआयडीसी या औद्योगिक पट्ट्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरीकरणाचा वेग अधिक आहे. लोकसंख्या वाढल्याने येथे 15 ऑगस्टला पिंपरी-चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्यात आले. त्यामुळेच पुण्याला समांतर शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. शहराची लोकसंख्याही 23 लाखांवर पोचली आहे. त्यामुळे शहरात मोठे रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. असे मोठे रेल्वे स्थानक करण्यासाठी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मची शेकडो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते.

पिंपरीत संरक्षण विभागाचा डेअरी फार्म आहे. शेकडो एकर जागेत हा डेअरी फार्म आहे. मात्र, संरक्षण विभागाने फार्म बंद केल्याने ही जागा पडून आहे. त्यामुळे सैन्यदलाकडून ही डेअरी फार्मची जागा रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करणे सहज शक्य आहे. कमी कालावधीत ही जागा उपलब्ध होऊ शकते. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा आहे. 

पुणे-मुंबई जुना महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग तसेच, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे मार्गही येथून सोयीचे आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून नाशिककडे जाणार्‍या प्रवाशांना या रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

त्यामुळे पिंपरी रेल्वे स्थानकाचा विस्तार करून या स्थानकालगतच्या संरक्षण विभागाच्या  डेअरी फार्मच्या शेकडो एकर जागेत रेल्वे जंक्शन उभारता येईल. या नवीन रेल्वे जंक्शनमुळे शहरातील लाखो प्रवाशांची सुखकर प्रवासाची सोय होईल. त्यामुळे जंक्शन उभारून मोठ्या रेल्वे स्थानकास मंजुरी द्यावी, अशी मागणी जगताप यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.