Thu, Jun 27, 2019 15:47होमपेज › Pune › जगाशी कनेक्ट असणार्‍या आयटीयन्सची वारी

जगाशी कनेक्ट असणार्‍या आयटीयन्सची वारी

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:34AMपुणे : समीर सय्यद

हिंजवडी, खराडीसह शहरातील विविध आयटीपार्कमध्ये काम करुन, संपूर्ण जगाशी कनेक्ट असणार्‍या आयटीयन्सची दिंडी गेल्या 11 वर्षांपासून कौतूकास पात्र ठरत आहे. यंदा सुमारे अडिच हजारांपेक्षा अधिक युवकांचा सहभाग असणार्‍या आयटीयन्सच्या या दिडींमध्ये विदेशी वारकरीही सहभागी होणार आहेत. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू असून, नवख्या आयटी वारकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिरेही घेतली जात आहेत. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तीन ते चार व्यक्तींनी ही आयटीयन्सची दिंडी सुरु केली. त्याला परराज्यातूनही मिळणारा प्रतिसाद पाहून, दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी ऑनलाईन करण्यात आली. गेल्यावर्षी 2000 हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यातील 1800 जण वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यात बंगरूळू, मुंबई, पुण्यामध्ये आटी क्षेत्रात काम करणार्‍या युवकांचा समावेश होता. या वर्षी सुमारे अडिच हजार वारकरी या वारीत सहभागी हातील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. 

टाळ कसा वाजवायचा, त्याचा ताल कसा धरायचा, पाऊल कसे खेळायचे, गजर कसा करायचा याचे प्रशिक्षण नव्या ‘आयटी’वारकर्‍यांना दिले जात आहे. दरवर्षीप्रमाणे मृदंग वादक, टाळकरी, ध्वज, पताका धारक, असे सर्व पारंपारिक वारकरी वेशात हे आयटीयन्स वारीमध्ये सहभागी होणार आहेत. वारीचा आनंद घेण्यासाठी या आयटी वारीची निर्मिती करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. 

वारीमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत ही दिंडी आळंदी ते पुणे आणि हडपसर ते सासवड या दोन मार्गाने जात होती. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, सासवड ते वाल्हे असा एक टप्पा असणार आहे. या दिंडीसाठी   www.waari.org संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आयटी क्षेत्रातीलच नव्हे तर इतर क्षेत्रातील नोकरदारही नोंदणी करू शकतात.