Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Pune › काँग्रेसचा राजीनामा नाट्यावर पडदा; आता कामाची वेळ  

काँग्रेसचा राजीनामा नाट्यावर पडदा; आता कामाची वेळ  

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 27 2018 10:15PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे राजीनामा नाट्यावर नुकताच पडदा पडला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समजूत काढल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांनी  राजीनामे मागे घेतले असे सांगितले गेले. वर्षभरावर लोकसभा व विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्याने ‘करू या मरू’ या पद्धतीने आता जोमाने काम करण्याची वेळ स्थानिक पदाधिकार्‍यांवर आली आहे. त्याशिवाय पक्षासमोर  पर्याय नसल्याचे चित्र आहे.

पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवर लक्ष देत नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ देत नाही. शहरातील पदाधिकार्‍यांची राज्यपातळीवरील पदे दिली जात नाहीत. त्यासह असंख्य मुद्दयांवर शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे 8 जुलैला तडकाफडकी राजीनामा दिला होत्या. त्याच्या दुसर्‍या दिवशी शहरातील विविध आघाड्याच्या इतर पदाधिकार्‍यांनेही  पदाचे सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस पक्ष शहरात शिल्लक राहते की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

दरम्यान, शहरातील ज्येष्ठ व माजी पदाधिकार्‍यांनी काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर देण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली होती. त्यामुळे नवे पदाधिकारी नियुक्त करणार की आहे त्यांना पुन्हा संधी देणार याकडे आजी-माजी पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत 21 जुलैला बैठक घेऊन शहराध्यक्ष सचिन साठे यांची समजूत काढली. त्याचे व शहर पदाधिकार्‍यांचे प्रश्न व मुद्दे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहेत. तसेच, साठे यांनी जाहीर व्यासपीठावर न जाता, काँग्रेसच्या वरिष्ठांकडे राजीनामे देऊन आपली खदखद व्यक्त केली. त्याच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी पक्षाचे राजीनामे दिले नव्हते.

त्यामुळे सर्वांना अभय देत पुन्हा जोमाने काम करण्याचा सूचना चव्हाण यांनी दिल्या. साठे यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामे मागे घेत पुन्हा पक्षाचे काम करण्याची ग्वाही दिल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  त्यामुळे साठे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांना आता जोमाने काम करावे लागणार आहे. रूसवे फुगवे बाजूला सारून एकत्रितपणे काम करण्याची कसोटी आता त्यांच्यापुढे आहे. वर्षभरावर लोकसभा व विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने पक्ष बांधणी करून संघटनावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहेत. नाराजाची समजूत काढून त्यांना पुन्हा सक्रिय करावे लागेल. आवश्यतेनुसार नव्याना संधी देऊन पक्षात काही बदल करण्याचे धाडसही त्यांना करावे लागणार आहे. त्याचबरोबर इतर पक्षाच्या वाटेवर असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रोखून धरण्याच्या दृष्टीने त्यांना पावले उचलावी लागणार आहेत.

दोन आठवड्यातच राजीनामा मागे

गेल्या चार वर्षांपासून सचिन साठे हे शहराध्यक्षपदावर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी फेबु्रवारीत झालेली महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. मोदी लाटेत पालिकेत पक्षाच्या एकाही नगरसेवकास संधी मिळाली नाही. राज्यासह देशभरात काँग्रेस उभारी घेत असताना, शहरातील पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षाच्या राज्य बैठकीत त्यावर गांभीर्याने चर्चा झाली. नेहमीप्रमाणे वरिष्ठांनी दुर्लक्ष न करता तातडीने नाराजांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली आणि त्यांनीही राजीनामे मागे घेतले. केवळ दोन आठवड्यात या राजीनामा नाट्यावर पदडा पडला.