Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Pune › संघर्ष यात्रा समारोपात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

मोदी सरकारवर चौफेर हल्ला

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 1:57AMपुणे : प्रतिनिधी

महिलांना मोफत गॅस दिले, परंतु त्यानंतर चुली बाहेर काढायला लावल्या. नोटाबंदी, जीएसटी, जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर या माध्यमातून जनसामान्यांचे आणि लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. वाढती महागाई, चढे इंधनदर यांसह विविध प्रश्‍नांबाबत मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल करत काँग्रेसने संघर्ष यात्रेचा समारोप केला. 

या संघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलामनबी आझाद, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस सोनम पटेल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, यांच्यासह काँग्रेसचे आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

गेली चार-साडेचार वषार्र्ंत मोदी सरकारने देशाला कंगाल केले आहे, अशी खरमरीत टीका करत आझाद म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्यातील महापुरुषांचे मोठे योगदान आहे. 

हीच लोकशाही धोक्यात आणण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. आम्ही संपविलेला दहशतवाद भाजप सरकारने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये आणला आहे. जेव्हा-जेव्हा लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होईल, तेव्हा-तेव्हा आम्हा काँग्रेसजनांना काम करावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत लोकशाहीला धोका निर्माण करणार्‍यांना हद्दपार करण्याचे काम आपणास करावयाचे आहे. 

बलात्काराच्या घटना थांबविण्यासाठी मोदींनी कधीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकही बैठक घेतली नाही. परदेशी दौर्‍यामुळे मोदींना देशातील घटनांकडे पाहयला वेळ मिळत नाही. सरकारच्या कारभारामुळे समाज दुभंगला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे पैसे कुणाच्या खिशात जातात, देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजकांची काय परस्थिती या जुलमी भाजप सरकारने केली आहे, हे आपण पाहात आहोत. या जुलमी भाजप सरकारच्या जोखडातून देशाला आणि राज्याला आपणास मोकळे करावयाचे आहे. 

खासदार खर्गे म्हणाले, भाजप सरकारने जनसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट नोटाबंदी करून देशाची आर्थिक स्थिती वाईट करून ठेवली. खोटे बोलून मोदींनी देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आणून ठेवला आहे. सत्ताधार्‍यांना जागा दाखवून देशातील लोकशाही वाचवायची आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले, पुणेकरांनी शंभर नगरसेवक, आठ आमदार, खासदार भाजपचे निवडून दिले आहेत. हे लोक शहराचा विकास करायचा सोडून मर्सिडीज गाड्या घेऊन खंडणी गोळा करत आहेत. सध्या राज्याचे मंत्रालय आत्महत्यालय झाले आहे. शेतमालाला हमीभाव आणि रिकाम्या हाताला काम द्या, मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ येणार नाही. फडणवीसांनी आणि मोदींनी खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणुका एकत्र घेण्यावरून सरकार गोंधळलेले आहे. निवडणुका कधीही घेतल्या तरी फसवणूक करणार्‍यांचा पराभव निश्‍चित आहे. चारुलता टोकस, डॉ. विश्‍वजित कदम, आ. संग्राम थोपटे, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केले.

विधानसभेच्या दावेदारांचे शक्तिप्रदर्शन 

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक दावेदारांनी सभास्थळी वाजत गाजत कार्यकर्ते आणून उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा आणत सभेत आपले फोटो आणि नावाचे फलक झळकतील याची व्यवस्था केली होती. कसबा मतदारसंघातील इच्छुकांनी पक्षाच्या मोठमोठ्या झेंड्यावर आपले नाव झळकवत दहीहंडीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.