Fri, Apr 26, 2019 00:02होमपेज › Pune › महिलेचा आजार व उपचाराविषयी संभ्रम

महिलेचा आजार व उपचाराविषयी संभ्रम

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी  

मांत्रिक प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेल्या संध्या सोनवणे यांचा मृत्यू हा प्राथमिक चौकशीनुसार ‘एसएलई’ आजारामुळे झाला आहे. त्यांच्या आजाराची लक्षणे, उपचार आदी बाबतीत या आजाराशी साधर्म्य आढळून येत आहे. पण, त्यांना दिलेले उपचार योग्य होते का की, त्यामध्ये निष्काळजीपणा झाला आहे हे उपचारांच्या कागदपत्रांचा शासकीय तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केल्यानंतरच पुढे येईल. 

‘सिस्टेमिक लिपस एरिथेमेटोसस’ अर्थात ‘एसएलई’ हा आजार शत्रूपेशीऐवजी स्वतःच्या शरीरातील अवयवांच्या पेशीविरुध्द लढतो. यामुळे अवयव निकामी होण्याचा धोका असतो. प्रामुख्याने पुरुषांपेक्षा तरुण महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते. या आजाराचा इतर अवयवांपेक्षा मूत्रपिंडावर लवकर परिणाम होऊ शकतो; तसेच शरीरावर रॅश येणे, यकृत, हृदय निकामी होणे हे घडू शकते. शस्त्रक्रिया करावी लागली असल्यास त्याचा प्रभाव अधिक जाणवतो, अशी माहिती नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय हुपरीकर यांनी दिली. यानुसार संध्या यांचे 24 वर्षे वय आणि निकामी झालेले मूत्रपिंड व इतर अवयव यामुळे त्यांचा मृत्यू याच आजारामुळे झाला असल्याची दाट शक्यता आहे.

हा आजार झाल्यास तो मधुमेह, रक्‍तदाब यांच्यासारखा कायमचा बरा न होता सतत शरीरासोबत राहतो. त्याला आटोक्यात आणण्यासाठी कायम औषधे (स्टिरॉइड्स) घ्यावी लागतात. जनुकीय दोषामुळे होणार्‍या या आजारामुळे शरीरावर पुरळ उठणे, सांधेदुखी, रक्‍तवाहिन्या बाधित होणे ही लक्षणे दिसून येतात. या आजाराचे निदान रक्‍तचाचणीद्वारे होते. पण, छातीत होणार्‍या गाठींचा आणि ‘एसएलई’ या आजाराचा संबंध नाही. गाठी या हार्मोन प्रक्रिया किंवा जंतुच्या संसर्गामुळे होऊ शकतात, अशी माहिती ससून रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोसले यांनी दिली. यामुळे संध्या यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा संभ्रम निर्माण झाला आहे. 

संध्या यांच्या दोन्ही स्तनांमध्ये गाठी (ब्रेस्ट अ‍ॅब्सेस) तयार झाल्या होत्या. त्या दोन्ही गाठी काढण्याच्या शस्त्रक्रिया डॉ. सतीश चव्हाण यांच्या ‘चव्हाण नर्सिंग होम’मध्ये करण्यात आल्या. दरम्यान, त्यासाठी त्या तीन महिने उपचार घेत होत्या. 

दुसर्‍या वेळी मात्र त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने त्यांना तेथून दीनानाथमध्ये हलविण्यात आले होते. त्यापूर्वी व नंतर या आजाराचे निदान झाले होते का आणि त्याचे उपचार सुरू केले होते का यावर आता पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. यामध्ये डॉक्टरांचा उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाला आहे का हे देखील तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

 

Tags : Pune, Pune news, Sandhya Sonawane, treatment, Confusion,