Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Pune › ‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता

‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:28AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे

दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. मुले चांगल्या गुणांनी उत्‍तीर्ण झाली आहेत. पुढे इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी प्रवेश घ्यायची मुलांची इच्छा आहे; मात्र कंपनीकडून पगारच झालेला नाही. त्यामुळे मुलांना पुढे प्रवेश कसे घ्यायचे? असा सवाल ‘एचए’ कामगार विचारत आहेत. 

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स कंपनीचे उत्पादन सुरू आहे. चार ते पाच युनिट सुरू करण्यात आले आहेत; मात्र तरीही कामगारांना गेल्या 14 महिने पगारापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे मुलांना शिकवायचे कसे, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. 

पुन्हा एकदा ‘एचए’ कंपनीतील कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न समोर आला आहे. कामगारांना एप्रिल ते जून असे सुमारे 14 महिने वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. पुन्हा वेतन रखडू लागल्यामुळे कामगारांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. सध्या कंपनीचे पाच युनिट सुरू असल्याची माहिती कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सध्या दहावी व बारावीचा निकाल लागला आहे. मुलांच्या पुढील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे. पगारच न झाल्याने मुलांना इंजिनिअरिंग व इतर ठिकाणी प्रवेश कसा घ्यायचा? असा सवाल कामगार उपस्थित करीत आहेत. कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुटुंबही कसे चालवायचे, असा सवाल कामगार उपस्थित करीत आहेत.  

‘एचए’ कंपनीचे पुनरुज्जीवनाची सातत्याने चर्चा सुरू असते. केंद्र सरकार आम्ही सकारात्मक असल्याचे पुढे आश्‍वासन देत नाही. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या ‘पीपीपी’ तत्त्वाची चर्चाच बंद झाली आहे. पुर्वी ‘एचए’ कंपनीच्या कामगारांचे थकीत वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडेप्रलंबित होता. तो प्रस्ताव मान्य करण्याचे आश्‍वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर कंपनीतील शिष्टमंडळाने दिल्‍लीला अनेक हेलपाटे मारल्यानंतर केंद्राकडून कामगारांना थकीत वेतन देण्यासाठी शंभर कोटी रुपये अदा केले. 

त्यामधून कामगारांचे सुमारे 24 महिन्यांपेक्षा अधिक रखडलेले थकित वेतन देण्यात आले. कंपनीतील कामगार निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हक्‍काची ‘पीएफ’ची रक्‍कम त्वरित मिळणे गरजेचे आहे. कंपनीमधील अनेक कामगार सध्या निवृत्त झाले आहेत. यांपैकी काही कामगारांना निवृत्त होऊनही अद्याप हक्‍काची ‘पीएफ’ची रक्‍कम मिळालेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे.